चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या कामात असलेल्या होमगार्ड व पोलीस कर्मचाऱ्यांना मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंतही भत्ता मिळाला नव्हता. आता विधानसभा निवडणूक समोर आली आहे. तेव्हा भत्त्यावरुन पोलीस दलात नाराजीचा सूर दिसून येत आहे.चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रात शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडावी, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस आणि होमगार्डसना तैनात करण्यात आले होते. ४ हजार ५०० पोलीस कर्मचारी आणि ७५९ होमगार्ड यांना कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी दिली होती. यात नागपूर आणि नाशिक येथील होमगार्डचा समावेश होता. मुंबई येथून २५० महिला पोलीस येथे बोलविण्यात आल्या. होमगार्डसना एक दिवसासाठी सुमारे आठशे रुपये भत्ता दिला जातो. परंतु निवडणूक विभागाने बूथवरील काही कर्मचाऱ्यास भत्ता देवून मोकळे केले आहे. त्यांचे सहकारी त्याच्यासोबतच काम करीत होते. परंतु त्यांना भत्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे भत्त्यावरुन येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये पोलीस दलात नाराजी पसरली आहे. लोकसभा निवडणुकीच्या रात्री प्रशासकीय भवनात आपला भत्ता घेण्यासाठी होमगार्ड गेले असता त्यांना भत्ता मिळाला नाही. जवळपास ३५० होमगार्डना भत्त्यापासून वंचित राहावे लागले. तसेच काही पोलीस कर्मचारीही भत्त्याच्या प्रतीक्षेत होते. निवडणूक काळातील तैनात कर्मचाऱ्यांना निवडणूक केंद्रावरच भत्ता देण्याची पद्धत आहे. मात्र, यातही दुजाभाव करण्यात आला. काही कर्मचाऱ्यांना मिळाला, तर काही वंचित राहिले. ज्यांना भत्ता मिळाला नाही, त्यांना चंद्रपूर येथील प्रशासकीय भवनात स्टॉल लावून भत्ता दिला जाईल, असे सांगितले. त्यानुसार कर्मचारी पोहोचलेसुद्धा. मात्र येथे भत्ता देण्यासंदर्भात कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे संतापलेले पोलीस कर्मचारी व होमगार्ड कर्मचाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन विचारणा केली. या अधिकाऱ्यांनीदेखील कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर दिले नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमधञये नाराजी पसरली आहे. निवडणुकीतील कर्तव्याचा भत्ता मिळाला नाही, याबाबत विचारणा कुणाकडे करायची, असा प्रश्न पोलीस विभागाकडे पडला आहे. त्यामुळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची नाराजी कायम आहे. (शहर प्रतिनिधी)
पोलिसांना निवडणुकीच्या भत्त्याची प्रतीक्षा
By admin | Updated: August 31, 2014 23:43 IST