व्हीव्हीपॅट पारदर्शकतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

By Admin | Updated: October 1, 2014 23:20 IST2014-10-01T23:20:29+5:302014-10-01T23:20:29+5:30

मतदान प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान यंत्रात वारंवार बदल घडवून आणले आहेत. १५ आॅक्टोबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील

VVPat is an important step towards transparency | व्हीव्हीपॅट पारदर्शकतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

व्हीव्हीपॅट पारदर्शकतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

मतदारांत उत्सुकता : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात प्रथमच वापर
चंद्रपूर : मतदान प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान यंत्रात वारंवार बदल घडवून आणले आहेत. १५ आॅक्टोबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील काही मतदार संघात व्हीव्हीपॅटचा उपयोग करुन निवडणूक आयोगाने पारदर्शकतेच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकले आहे. हा प्रयोग चंद्रपूर विधानसभा मतदार संघात प्रथमच होत असून व्हीव्हीपॅट विषयी मतदारांत कमालीची उत्सुकता आहे.
बॅलेट बॉक्स, ईव्हीएम मशीन ते व्हीव्हीपॅट असा मतदान प्रक्रियेचा प्रवास असून महाराष्ट्रातील चंद्रपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम व अहमदनगर शहर या मतदार संघात व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. आपण केलेले मतदान त्याच उमेदवाराला पडले की नाही, हे या यंत्रात मतदारांना पाहता येणार आहे.
वोटर व्हेरीफियबल पेपर आॅडीट ट्रायल सिस्टम अर्थात व्हीव्हीपॅट महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोग प्रथमच वापरणार आहे. ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट यंत्र जोडलेले असणार आहे. मतदारांनी मतदान केल्यानंतर सात सेकंदापर्यंत या मशिनवर ज्या उमेदवाराला मतदान केले, त्याचे चिन्ह, अनुक्रमांक व नाव मतदाराला पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. ईव्हीएमवरील एका उमेदवाराच्या चिन्हावरील बटन दाबल्यावर दुसऱ्याच उमेदवाराला मतदान पडते, अशा घटना व तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्यामुळे व्हीव्हीपॅटची निर्मिती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशिनवरच होणार असून व्हीव्हीपॅट फक्त मतदान ज्यांना केले ते बरोबर आहे की नाही, हे पाहण्याची सुविधा आहे.
मतदान ज्या व्यक्तीला केले, त्याला न पडता दुसऱ्याच व्यक्तीला पडले, असे मतदाराच्या निदर्शनास आल्यास मतदान केंद्र अधिकाऱ्याकडे तात्काळ तक्रार नोंदविता येईल. त्यानंतर मतदान केंद्र अधिकारी तक्रारीची दखल घेवून मतदारासमोर त्याच चिन्हावर डमी वोट करण्याची लेखी प्रक्रिया करेल. मतदाराच्या तक्रारीत सत्य आढळून आल्यास त्या मशिनवरील मतदान प्रक्रिया स्थगित केली जाईल. तक्रार खोटी असल्यास संबंधितावर निवडणुक कार्यपद्धतीच्या कामात अडथळा आणला म्हणून मतदान केंद्रा अधिकाऱ्यांमार्फत तात्काळ फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. (प्रतिनिधी)

Web Title: VVPat is an important step towards transparency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.