ग्रामस्थांनी बंद पाडले चखविरखल शाळा बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST2020-02-18T05:00:00+5:302020-02-18T05:00:52+5:30
सावली पंचायत समिती अंतर्गत चकविरखल येथे १२ लाख ४७ हजार रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेतून एका वर्गखोलीचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. या कामात अनियमितता होत असल्याचे कंत्राटदार के. आर. पुल्लुरवार आणि कनिष्ठ अभियंता गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिले.

ग्रामस्थांनी बंद पाडले चखविरखल शाळा बांधकाम
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : तालुक्यातील चकविरखल येथील जिल्हा परिषद शाळेतील नवीन वर्गखोलीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. सदर काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे तक्रारी केली. त्याची दखल घेत पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांनी बांधकामाची पाहणी करून काम बंद पाडले.
सावली पंचायत समिती अंतर्गत चकविरखल येथे १२ लाख ४७ हजार रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेतून एका वर्गखोलीचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. या कामात अनियमितता होत असल्याचे कंत्राटदार के. आर. पुल्लुरवार आणि कनिष्ठ अभियंता गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने ग्रामस्थांनी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांच्याकडे तक्रार केली. त्याची तत्काळ दखल घेत त्यांनी शाळेला भेट दिली. यावेळी काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने त्यांनी काम बंद पाडले. त्यानंतर संबंधित अभियंत्यांना झालेल्या कामाचा दर्जा सुधारण्याचे आदेश दिले.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम अभियंत्यांनी कामावर लक्ष न दिल्याने बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून जोपर्यंत कामाचा दर्जा सुधारणार तोपर्यंत काम होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.
संबंधित अभियंता व कंत्राटदाराची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी तसेच कामाची चौकशी करावी, अशी मागणी सभापती कोरेवार यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
शाळेच्या वर्गखोलीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी आपल्याकडे केली होती. त्यानुसार आपण घटनास्थळावर जावून चौकशी केली. निष्कृष्ट बांधकाम होत असल्यामुळे बांधकाम बंद पाडले. यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली आहे.
- विजय कोरेवार,
सभापती
पंचायत समिती, सावली
शाळा वर्गखोलीचे बांधकाम निकृष्ट होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. त्यामुळे काँक्रीट तोडून नव्याने काम करून देण्यात येणार आहे.
- के.आर. पुल्लुरवार
कंत्राटदार