कन्हाळगाव अभयारण्याला ग्रामस्थांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:21 IST2021-02-20T05:21:12+5:302021-02-20T05:21:12+5:30
गोंडपिपरी : गोंडपीपरी,बलारपूर पोंभूर्णा तालुक्यातील क्षेत्रात येणाऱ्या कन्हाळगाव अभयारण्याची शासनाने नुकतीच घोषणा केली. परंतु हा निर्णय घेताला ग्रामस्थांच्या विविध ...

कन्हाळगाव अभयारण्याला ग्रामस्थांचा विरोध
गोंडपिपरी : गोंडपीपरी,बलारपूर पोंभूर्णा तालुक्यातील क्षेत्रात येणाऱ्या कन्हाळगाव अभयारण्याची शासनाने नुकतीच घोषणा केली. परंतु हा निर्णय घेताला ग्रामस्थांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात न आल्याने या निर्णयात स्पष्टता नसल्यामुळे अभयारण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी करीत रास्ता रोका आंदोलन केले.
या भागातील प्रभावित होणाऱ्या गावातील जनतेला विश्वासात घेण्यात आले नाही. ग्रामपंचायत ठराव घेतला नाही, स्थानिक लोकांच्या रोजगाराच्या समस्यांचे समाधान करण्यात आले नाही, पुनर्वसनबाबत स्पष्टता नाही यामुळे यापूर्वी हे अभयारण्य रद्द करण्याची निवेदन जिल्हाधिकारी, वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना देण्यात आले. परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. अखेर शासनाचे लक्ष बेधून घेण्यासाठी व अभयारण्याच्या निर्णय रद्द करण्याची मागणी करीत चंद्रपूर-अहेरी महामार्गावर सुमारे पाऊण तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रभावित गावातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते, मोर्चाचे नेतृत्व कन्हाळगावचे सरपंच प्रदीप कुलमेथे, प्रमोद काटकर, अरुण धकाते, राजू झोडे, पांडुरंग जाधव आदींनी केले.
प्रथम रॅली काढून नंतर अहेरी-चंद्रपूर महामार्गावर आंदोलन करीत पाऊण तास रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान घटनास्थळी आलेले गोंडपीपरीचे तहसीलदार के. डी. मेश्राम यांना आंदोलकांनी मागणीचे निवेदन दिले. आंदोलकांनी या अभ्यारण्यामुळे होणारी समस्या व मागणीबाबत मार्गदर्शन केले.
आंदोलन स्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजासिंग पवार यांच्या नेतृत्वात, दंगा नियंत्रण पथक, कोठारी, धाबा,राजुरा येथील पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.