चंद्रपूरच्या किल्लावरील ‘युनियन जॅक’ला १९९ वर्षे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2017 00:32 IST2017-05-21T00:32:12+5:302017-05-21T00:32:12+5:30
ब्रिटिशांनी पठाणपुरा गेटजवळ युद्ध करून गोंडराजाला पराजय स्वीकार करण्यास बाध्य केले होते.

चंद्रपूरच्या किल्लावरील ‘युनियन जॅक’ला १९९ वर्षे
२० मे १८१८ : ‘इको-प्रो’तर्फे युद्ध शहिदांना श्रद्धांजली
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रिटिशांनी पठाणपुरा गेटजवळ युद्ध करून गोंडराजाला पराजय स्वीकार करण्यास बाध्य केले होते. त्यानंतर त्यांनी पठाणपुरा गेटवर २० मे १८१८ रोजी ‘युनियन जॅक’ फडकविला होता. त्या घटनेला शनिवारी १९९ वर्षे पूर्ण झाली. त्या युध्दातील शहिदांना ‘इको-प्रो’तर्फे श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.
चंद्रपूर शहर २० मे १८१८ रोजी इंग्रजाच्या ताब्यात गेले होते. १०-१२ दिवस चाललेल्या या युध्दात नागपूरकर भोसल्यांच्या व गोंडराजाच्या सैनिकांना पराभव स्वीकारावा लागला होता. या युध्दात चंद्रपूरचे किल्लेदार गंगासिंग जाट शहीद झाले. त्यांच्या समाधी परिसरात इको-प्रो संस्थेने स्वच्छता अभियान राबवून पुष्प अर्पण केले. यावेळी इतर शहीद सैनिकांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, गणेशसिंग ठाकूर, इको-प्रोचे नितीन बुरडकर, नितीन रामटेके व धर्मेद्र लुणावत उपस्थित होते.
या युद्धात ब्रिटिश अधिकारी मेजर कोरहॅमसुध्दा मारला गेला होता. इंग्रजांनी पठाणपुरा गेट बाहेर एका शेतात मेजर कोरहॅम व इंग्रज सैन्यातील सैनिकांची समाधी बांधल्या आहेत. या परिसरातसुध्दा इको-प्रो सदस्यांनी स्वच्छता अभियान राबविले.
इको-प्रोने १ मार्चपासून ‘चंद्रपूर किल्ला (परकोट) स्वच्छता अभियान’ सुरू केले आहे. आज अभियानाचा शनिवारी ७५ वा दिवस होता. र्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी इतिहासाबाबत इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाला इको-प्रो चे विनोद दुधनकर, मनीष गांवडे, हरीश मेश्राम, वैभव मडावी, विकील शेंडे, सुनील पाटील, अभय अमृतकर, सचिन धोतरे उपस्थित होते.
शहीद किल्लेदार गंगासिंग जाट
गंगासिंग हा आप्पासाहेब भोसल्याचा चंद्रपूर येथील एक विश्वासू किल्लेदार होता. त्याचे आडनाव दिघ्वा असे होते. जटपुरा गेट परिसरात त्याकाळी जाटांची बरीच वस्ती होती. त्यामुळे या गेटचे नाव जटपुरा गेट पडले आहे. गंगासिंगाच्या घरासमोर झालेल्या हातघाईच्या लढाईत गंगासिंग गंभीर जख्मी झाला होता. त्यामुळे त्याने विष प्राशन केले होते. कारण कैद केल्यावर इंग्रज शिक्षा करतील, असे त्याला वाटले. तसेच मरण्याआधी पठाणपुरा गेटवरील गोलदांज अलीखान तोपची याने तोफेचा मारा करून इग्रंज अधिकारी मेजर कोरहॅम यास ठार केले होते. इंग्रज अधिकाऱ्यास ठार केल्याबद्दल गगांसिंगने अलीखानला जवळ बोलावून त्याचा मोठा गौरव करून बक्षीस दिले.