दोन हजारांवर शाळांमध्ये वाजणार आजपासून घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 05:00 AM2021-10-04T05:00:00+5:302021-10-04T05:00:38+5:30

शाळा सुरू होणार असल्या तरी प्रत्येक शाळेमध्ये सध्या आर्थिक ठणठणाट आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांचा ताण वाढला आहे. समग्र शिक्षा अभियानाचा सर्व निधी व्याजासह शासनाने परत घेतला आहे. त्यामुळे शाळेची स्वच्छता, सॅनिटायझर यांसह वेळोवेळी येणाऱ्या आर्थिक अडचणी कशा भागवायच्या, असा प्रश्न सध्या शिक्षकांना पडला आहे. अडचणीच्या वेळी पुन्हा ग्रामस्थांसमोरच हात पसरविण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.

Two thousand bells will ring in schools from today | दोन हजारांवर शाळांमध्ये वाजणार आजपासून घंटा

दोन हजारांवर शाळांमध्ये वाजणार आजपासून घंटा

googlenewsNext

साईनाथ कुचनकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बंद असलेल्या शाळा आता सुरू होणार असून, जिल्ह्यात दोन हजारांवर शाळांमध्ये आजपासून घंटा वाजणार आहे. शाळा सुरू होणार असल्याच्या निर्णयामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शाळा प्रशासनानेही वर्गातील धूळ साफ केली असून, पुन्हा नव्या दमाने शाळेतील किलबिल सुरू होणार आहे.
जिल्ह्यात २ हजार ५०४ शाळा आहेत. यामध्ये १ हजार ६३७ शासकीय, तर ४८९ खासगी शाळा आहेत. शहरी भागातील आठवी ते बारावी तसेच ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याची शासनाने परवानगी दिली आहे. यामुळे प्रशासनाने शाळांना तसे निर्देश दिले आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासंदर्भातील नियोजन पूर्ण केले आहे. शाळा पूणर्णवेळ सुरु राहणार असल्या तरी परीपाठ किंवा इतर कार्यक्रमांवर बंदी आहे. शालेय पोषण संदर्भात अद्यापही निर्णय झाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच जेवणाचा डब्बा आणावा लागणार आहे. त्यातही सामुहिकरित्या बसून जेवणावरही निर्बंध आहे.

अधिकारी देणार भेटी
मागील दीड वर्षानंतर आता शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे या शाळांचे नियोजन तसेच कोरोना नियम, शिक्षकांची उपस्थिती या सर्व बाबींकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत.

शाळांमध्ये ठणठणाट
- शाळा सुरू होणार असल्या तरी प्रत्येक शाळेमध्ये सध्या आर्थिक ठणठणाट आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांचा ताण वाढला आहे. समग्र शिक्षा अभियानाचा सर्व निधी व्याजासह शासनाने परत घेतला आहे. त्यामुळे शाळेची स्वच्छता, सॅनिटायझर यांसह वेळोवेळी येणाऱ्या आर्थिक अडचणी कशा भागवायच्या, असा प्रश्न सध्या शिक्षकांना पडला आहे. अडचणीच्या वेळी पुन्हा ग्रामस्थांसमोरच हात पसरविण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.

पालकांमध्ये आनंद
- मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याशिवाय ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक विद्यार्थी मोबाईलच्या मोहजाळ्यात अडकले होते. त्यामुळे पालकांची चिंता वाढली होती. 
- आता शाळा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मुलांना ठेवण्याची चिंता मिटली 

शाळा बंद होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आम्ही शेतात जातो. मुले पूर्वी शाळेत असायची. त्यामुळे चिंता नव्हती. शाळा नसल्याने आपली मुले शाळेविना गावात सुरक्षित कशी राहील, याची भीती प्रत्येक आई-वडिलांना होती. आता शाळा सुरू होणार असल्याने पाल्य किमान दिवसभर शाळेत शिक्षकांसमवेत सुरक्षित राहील. शिवाय शैक्षणिक नुकसानही होणार नाही.
- रूपाली लोेहे, पालक, गोवरी

 कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. विशेषत: शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांनाही शैक्षणिक प्रवाहात आणण्यात येणार आहे.
-उल्हास नरड
शिक्षणाधिकारी, माध्यमिक

कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता शाळा सुरू होणार असल्यामुळे शिक्षक तसेच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करावा लागणार आहे.
- जे.डी. पोटे
शिक्षण समिती सदस्य
जि.प. चंद्रपूर

 

Web Title: Two thousand bells will ring in schools from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा