गोंडपिपरी : आगीने पेट घेतल्याने दोन घरे जळून खाक झालीत. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव येथे सोमवारी चार वाजताच्या सुमारास घडली. गावकऱ्यांनी पुढाकार घेत आग विझविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत रमेश ऐणगंटीवार, दिवाकर ऐणगंटीवार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या वेडगाव येथील रमेश ऐणगंटीवार, दिवाकर ऐणगंटीवार यांच्या घरी आगीने पेट घेतला. बघता बघता आगीचा भडका वाढला. आरडाओरड केल्याने गावकरी धावून आले. मोठ्या प्रयत्नाने आग विझविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत घराची राखरांगोळी झाली होती. या आगीत दोन्ही भावंडाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. ऐन लाॅकडाऊनच्याचा काळात घराची राखरांगोळी झाल्याने ऐणगंटीवार कुटुंबीयावर मोठे संकट कोसळले आहे. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.