राजुऱ्यात आदिवासींचे धरणे आंदोलन

By Admin | Updated: August 17, 2014 23:06 IST2014-08-17T23:06:02+5:302014-08-17T23:06:02+5:30

आदिवासींच्या आरक्षणाची मागणी करून आदिवासी प्रवर्गात शिरू पाहणाऱ्या धनगर या जातीसह इतर जातींच्या घुसखोरीला विरोध करणे व आता आदिवासींना भेडसावणाऱ्या इतर मागण्यांच्या पुर्ततेसाठी

Tribal movement | राजुऱ्यात आदिवासींचे धरणे आंदोलन

राजुऱ्यात आदिवासींचे धरणे आंदोलन

राजुरा : आदिवासींच्या आरक्षणाची मागणी करून आदिवासी प्रवर्गात शिरू पाहणाऱ्या धनगर या जातीसह इतर जातींच्या घुसखोरीला विरोध करणे व आता आदिवासींना भेडसावणाऱ्या इतर मागण्यांच्या पुर्ततेसाठी आदिवासी समाज बांधवांनी आदिवासी आरक्षण बचाव समितीचे सभासद बापुराव मडावी यांच्या नेतृत्वात राजुरा येथील उपविभागीय कार्यालयासमोर एकदिवस धरणे दिले. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले.
आदिवासी शांत संयमी असला तरी त्यांचा अंत पाहु नका, तुम्ही पोटभर जेवण करा, मात्र आमच्या तोंडातील घास हिसकावण्याचा प्रयत्न केल्यास ते हात तोडून टाकण्यास आम्ही मागे पाहणार नाही. आजपर्यंत आदिवासींच्या जमिनी हडपल्या, त्यांच्या नोकऱ्या चोरल्या. परंतु स्वत:ला सुशिक्षीत व सुज्ञ समजणारे हे लोक आदिवासींची जातही चोरायला निघाले आहेत. अशा चोरांनी व त्यांना सहकार्य करणाऱ्या स्वार्थी राजकारणी नेत्यांना येत्या निवडणुकीत अद्दल घडवा, असे आवाहनही समाज बांधवांना यावेळी करण्यात आले. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना धनगर जातीला आदिवासीमध्ये समावेश करण्यास विरोध दर्शविला.
धनगर जातीसह अन्य जातीला आदिवासीमध्ये समाविष्ट करू नये, अनुसुचित क्षेत्रासाठी लागू झालेल्या पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, ९ जूनला राज्यपालांनी काढलेल्या अधिसुचनेची वेळीच अंमलबजावणी करा, चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासींसाठी असलेल्या १५ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, वनजमिनीचे पट्टे तातडीने देण्यात यावे, स्थानिक पुराव्याच्या आधारे जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. हे निवेदन प्रभारी उपविभागीय अधिकारी खलाटे यांनी स्विकारले.
धनगर आदिवासी हो नही सकता... हमारा हक ले नही सकता, आदिवासी जागो हो.. संघर्षाचा धागा हो, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत आदिवासी समाज बांधवांनी भवानी मंदिरापासून भव्य रॅली काढली.
आरक्षण बचाव कृती समितीचे संयोजक बापुराव मडावी, जि.प. सदस्य भिमराव पा. पुसाम, नगराध्यक्ष मंगला आत्राम, सुधाकर उईके, जितेश कुळमेथे, वाघुजी गेडाम, पं.स. सदस्य निर्मला कुळमेथे, श्यामराव कोटनाके, भाऊ कन्नाके, लिंगु पा. कुमरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या रॅलीत राधाबाई आत्राम, कुंदा सलाम, प्रभाकर उईके, जंगु वेडमे, शंकर तोडासे यांच्यासह शेकडो समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते. आभार धिरज मेश्राम यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Tribal movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.