निफंद्रा येथील अवैध वाळू तस्करीतील ट्रॅक्टर जप्त
By Admin | Updated: February 27, 2016 01:27 IST2016-02-27T01:27:47+5:302016-02-27T01:27:47+5:30
सावली तहसील मुख्यालयापासून पंचेवीस किलोमीटर अंतरावरील निफंद्रा येथील वैनगंगा नदीघाट परिसरातून अवैध रेती तस्करी होत असल्याची माहिती मिळताच,

निफंद्रा येथील अवैध वाळू तस्करीतील ट्रॅक्टर जप्त
तस्करांचे धाबे दणाणले : सावली तहसीलदारांची कारवाई
गेवरा : सावली तहसील मुख्यालयापासून पंचेवीस किलोमीटर अंतरावरील निफंद्रा येथील वैनगंगा नदीघाट परिसरातून अवैध रेती तस्करी होत असल्याची माहिती मिळताच, सावलीच्या तहसीलदार वंदना सौरंगपते व नायब तहसीलदार चन्नावार यांनी गुरुवारी रात्री ८ वाजता नदीघाटावर धाड टाकली. वैनगंगेच्या पात्रातील डोंगा घाटावर रेतीचा अवैध उपसा करणाऱ्या तस्करांना रंगेहात पकडून ताब्यात घेतले.
यापूर्वी ‘लोकमत’ने सदर घाटावरून मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा केला जात असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यावेळी स्थानिक तलाठ्याने अशी कुठलीही रेती तस्करी होत नसल्याचे सांगून तस्करीला पाठबळ देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याबाबत स्थानिक जागरूक नागरिकांनीच तस्करीबाबत माहिती दिल्यानंतरही असे घडलेच नाही, असी बतावणी वरिष्ठांना केली जात होती. परंतु निफंद्रा येथील पोलीस पाटील हरिभाऊ बोळे यांनी या विषयाला गंभीरतेने घेवून अवैध रेती तस्करांवर स्थानिक युवकांच्या मदतीने पाळत ठेवली. गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास एक ट्रक्टर वैनगंगा डोंगाघाटाकडे रवाना झाल्याची माहिती तहसीलदार सावली यांना भ्रमणध्वनीवरून देण्यात आली. त्यानुसार तहसीलदार वंदना सौरंगपले व नायब तहसीलदार चन्नावार रात्री ८ वाजताच्या सुमारास प्रत्यक्ष वैनगंगा पात्रात पोहचले. तेथे रेतीचा उपसा सुरू असल्याचे दिसून आले. हे अधिकारी ट्रॅक्टरजवळ पोहचताच ट्रॅक्टरबाबत चौकशी केली असता, सदर ट्रॅक्टर निफंद्रा येथील माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यशवंत बोरकुटे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर असल्याचे निष्पन्न झाले. तहसीलदार वंदना सौरंगपते यांनी रेतीने भरलेला ट्रॅक्टर जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी तहसीलमध्ये जमा केला आहे. या कारवाईने अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. प्रत्येक गावातील जागरूक नागरिक, पोलीस पाटील, सरपंच यांनी सामाजिक बांधीलकीने अवैध व्यवसायावर नियंत्रणासाठी आपली भूमिका स्पष्टपणे बजावली तर असे गैरकृत्य होणार नाही, अशा प्रतिक्रीया निफंद्रा येथील पोलीस पाटील हरिभाऊ बोळे यांनी व्यक्त केल्या. (वार्ताहर)