मूल : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम संपली. शुक्रवारी २७४ सदस्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे. यासाठी तालुका प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून, १०९ केंद्रात कर्मचारी व पोलीस कामाला लागले आहेत.
निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉ.रवींद्र होळी, निवडणूक नायब तहसीलदार यशवंत पवार विशेष लक्ष ठेवून आहेत. तालुक्यात ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, २७४ सदस्यांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे. यात ६९३ उमेदवार रिंगणात असून, ५१ हजार ६७७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. डोअर टु डोअर प्रचार थांबला असून, रात्रीला होणारा प्रचार उमेदवाराला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे. सरपंच पदाचे आरक्षण पूर्वीच जाहीर न झाल्याने सरपंचपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी, यासाठी आपला गट निवडून यावा, यासाठी प्रयत्न चालविला जात आहे. शासन विविध कामांसाठी थेट ग्रामपंचायतीला निधी देत असल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने भाजपा, काँग्रेस या पक्षात चुरस असली तरी शिवसेना, बसपा, वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. गावगाड्यातील राजकारण शहरापेक्षा वेगळे असल्याने वातावरण केव्हा तापेल, याचा नेम नाही. यासाठी तालुका प्रशासन ३५ गावात पोलीस यंत्रणेसह विशेष लक्ष ठेवून असल्याचे जाणवते.