थरारक! बसस्थानकावरच दोन भावंडांवर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 23:41 IST2022-10-07T23:40:48+5:302022-10-07T23:41:40+5:30
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दोघांच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरू झाला व बचावासाठी आरडाओरडा करू लागले. पण रात्रीची वेळ असल्याने बसस्थानक परिसर हा निर्मनुष्य होता. त्यामुळे मदतीला कुणीही आले नाही. काही वेळानंतर काहींनी जखमी अवस्थेत असलेल्या या भावंडांना उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. पण गंभीर अवस्थेत असल्याने त्यांना चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

थरारक! बसस्थानकावरच दोन भावंडांवर प्राणघातक हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : सास्ती येथील रहिवासी करण व आकाश कंडे हे सख्खे भावंडे स्वगावी परतत असताना एका टोळीने राजुरा बसस्थानक परिसरात धारदार शस्त्राने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेने शहर चांगलेच हादरले आहे. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून शहरात गुंडगिरी वाढल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. करण व आकाश कंडे हे दोघे भाऊ राजुरामार्गे सास्तीला जात होते. गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास बसस्थानक परिसरात काही ५ ते ६ जणांच्या टोळीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. एका भावाच्या पोटात चाकूने हल्ला केल्याने आतडी बाहेर निघाल्याचे सांगण्यात येत आहे. अन्य एका भावाच्या डोक्यावर मारण्यात आले.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दोघांच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरू झाला व बचावासाठी आरडाओरडा करू लागले. पण रात्रीची वेळ असल्याने बसस्थानक परिसर हा निर्मनुष्य होता. त्यामुळे मदतीला कुणीही आले नाही.
काही वेळानंतर काहींनी जखमी अवस्थेत असलेल्या या भावंडांना उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. पण गंभीर अवस्थेत असल्याने त्यांना चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.