सिमेंट रस्त्यांसाठी हजार कोटींचा निधी आणणार
By Admin | Updated: February 27, 2016 01:15 IST2016-02-27T01:15:39+5:302016-02-27T01:15:39+5:30
चंद्रपूर शहरातील समस्या सोडविण्यासाठी मनपा प्रयत्न करीत आहे. पालकमंत्री असल्याने आपलाही प्रयत्न सुरू आहे.

सिमेंट रस्त्यांसाठी हजार कोटींचा निधी आणणार
सुधीर मुनगंटीवार : मनपाच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील समस्या सोडविण्यासाठी मनपा प्रयत्न करीत आहे. पालकमंत्री असल्याने आपलाही प्रयत्न सुरू आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. सैनिकी शाळाही सुरू होत आहे. वन उद्यान तयार करण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविध योजनांच्या माध्यमातून सिमेंट रस्त्यांसाठी सुमारे एक हजार कोटी आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे अर्थ व वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवनिर्मित ‘महात्मा गांधी भवन’ या इमारतीचे उदघाटन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर राखी कंचर्लावार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, आ.नाना शामकुळे, आ.अनिल सोले, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, उपमहापौर वसंत देशमुख, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, सभागृह नेते रामू तिवारी यांच्यासह सभापती, नगरसेवक उपस्थित होते.
सामान्य जनतेच्या कल्याणासाठी महानगरपालिका अव्याहतपणे काम करीत असते. जनतेसाठी काम करत असतानाच आपली महानगरपालिका कामाच्याबाबतीत सर्वोत्कृष्ट कशी राहील, यासाठी महापौरांसह सर्व नगरसेवकांनी प्रयत्नशिल राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले. नव्याने बांधण्यात आलेली इमारत उत्तम दर्जाची असून चांगल्या कामासाठी ही इमारत प्रेरणा देईल. सामान्य नागरिकांच्या कल्याणांच्या योजना येथे चांगल्या पध्दतीने राबविल्या जातील, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. मनपाच्या नगरसेवकांवर सामान्यांच्या कल्याणाची मोठी जबाबदारी असते. तसेच ही संधीसुध्दा आहे. ही जबाबदारी प्रत्येक नगरसेवकाने यशस्वीपणे पूर्ण केली पाहिजे, असेही ते म्हणाले. महानगरपालिका अनेक प्रश्नांबाबत सातत्याने धडपडत असते. आपल्या क्षेत्रातील नागरिकास चांगल्या सुविधा दिल्या पाहिजे यासाठी ही धडपड असली पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी ना. हंसराज अहीर म्हणाले, मनपाला केंद्र शासनही निधी देऊ शकते. त्यासाठी मनपाने चांगले प्रस्ताव तयार करावे व केंद्राकडे पाठवावे. आपण त्या प्रस्तावाला मंजुरी मिळवून देऊ. (शहर प्रतिनिधी)
विमानतळासारखे चमकणार बसस्थानक
आज बसस्थानकांमध्ये एवढे घाणीचे साम्राज्य असते की बसायची इच्छा होत नाही. पिणेयोग्य पाणी नसते. मात्र विमानतळावर जाऊन बघा, तिथे सर्वत्र चकाचक असते. चंद्रपूर, मूल व बल्लारपूर बसस्थानक अशाच स्वरुपाचे चकाचक बसविण्याचा आपला मानस असल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. या दिशेने आपला प्रयत्न सुरू झाला असून लवकरच बसस्थानक विमानतळासारखे चमकणार आहे, असेही ते म्हणाले.