तीन महिने लोटूनही वेतन नाही
By Admin | Updated: May 7, 2015 00:59 IST2015-05-07T00:59:51+5:302015-05-07T00:59:51+5:30
कोरपना तालुक्यातील मुर्ली अॅग्रो सिमेंट कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून अद्यापही वेतन देण्यात आले नाही.

तीन महिने लोटूनही वेतन नाही
रत्नाकर चटप नांदाफाटा
कोरपना तालुक्यातील मुर्ली अॅग्रो सिमेंट कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून अद्यापही वेतन देण्यात आले नाही. यामुळे कंपनीत काम करणाऱ्या जवळपास ७०० कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत वारंवार जिल्ह्याचे पालकमंत्री व स्थानिक आमदारांना निवेदने देण्यात आली. मात्र लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरविल्याची प्रतिक्रिया आता कामगारांमध्ये उमटत आहे.
नुकतीच कामगारांनी चंद्रपूर येथे जाऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार संजय धोटे यांची भेट घेतली. यावेळी मागील गुरुवारपर्यंत कंपनी प्रशासन भूमिका घेईल अन्यथा कंपनी प्रशासनाविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन कामगारांना देण्यात आल्याचे कामगारांनी सांगितले. परंतु तो दिवस उलटूनही अद्याप तोडगा निघालेला नाही. गेल्या तीन महिन्यापासून मुर्ली अॅग्रो सिमेंट कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर कामगार आंदोलन करीत आहे. तर यापूर्वी उपोषणही करण्यात आले. परंतु कामगारांना न्याय मिळालेला नाही. हातात वेतनच मिळत नसल्याने कुटुंबाचा भार कसा सोसावा, असा प्रश्न आता कामगारांपुढे उभा आहे. ज्या स्थायी कामगारांना कामावर घेतलेले आहे, त्याही कामगारांची अवस्था कंत्राटी कामगारांप्रमाणेच आहे. यातील अनेक कामगार बाहेरगावावरून आलेले असून किरायाणे राहतात. मुलांच्या इंग्रजी शिक्षणाची सोय म्हणून शहरात राहावे लागत असल्याने महिन्याचा खर्चही वाढत आहे आणि यातच गेले तीन महिने उधारी करून रोजची गरज भागविली जात आहे. कामगारांच्या आंदोलनाला नेत्यांनी भेटी दिल्या. प्रसंगी सांत्वन केले. परंतु वेतनाचा प्रश्न मात्र कायम आहे. सध्या कंपनी बंद असून उत्पादनही काढले जात नाही. उत्पादन निघाल्यानंतर लगेच वेतन दिले जाईल, अशी उत्तरे कंपनी प्रशासनाकडून मिळत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. काही कामगार या कंपनीत गडचांदूर, कोरपना, वणी आदी ठिकाणाहून दुचाकीने येतात. त्याचा रोजचा खर्च साधारण १०० रुपये आहे. १ रुपयाही मिळत नसल्याने काही कामगारांनी कंपनीत कामास येणेही बंद केल्याचे दिसते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी त्वरित याकडे लक्ष द्यावे, अशी कामगारांची मागणी आहे.