प्रवीण खिरटकर लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : 'माझी पत्नी प्रयागराजला गेली आहे, तू घरी ये, एक हजार रुपये देतो', असा मेसेज शिक्षकाने विद्यार्थिनीला केला. हा मेसेज विद्यार्थिनीने कुटुंबीयांना दाखविला. त्यानंतर वडील तसेच भावाने थेट शिक्षकाचे घर गाठून चांगलाच चोप दिल्याची घटना वरोरा शहरात घडली. बदनामी होईल, या भीतीने विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार देणे टाळले, मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याच शिक्षकाने काही महिन्यांपूर्वी दुसऱ्या एका विद्यार्थिनीची छेड काढली असता, तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर त्याला संस्थेने निलंबितही केले होते, हे विशेष.
शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते पतित्र मानले जाते. मात्र मागील काही वर्षांमध्ये या नात्यामध्येही काही शिक्षकांकडून काळिमा फासण्याचा प्रयत्न केला जात आहे. असाच प्रकार वरोरा शहरातही घडला. आपल्याच विद्यार्थिनीला मोबाइलवर मेसेज केला. हा मेसेज येताच तिने आपल्या कुटुंबीयांना दाखविला. शिक्षकाकडून असा मेसेज येणे अपेक्षित नसल्याने वडिलांसह भावाचाही पारा चढला आणि त्यांनी थेट शिक्षक राहत असलेल्या ले-आउटमध्ये जाऊन शिक्षकाचे घर गाठले. त्यानंतर याबाबत जॉब विचारण्यात आला.
एवढेच नाही तर शिक्षकाला चांगलाच चोप देण्यात आला. ले-आउटमधील रहिवासी हा प्रकार बघत होते, तर काहींना याची कल्पनासुद्धा आली. विशेष म्हणजे, यापूर्वीही याच शिक्षकाने एका विद्यार्थिनीची छेडछाड केली होती. याबाबतची तक्रार पोलिसांत करण्यात आली होती. तेव्हा शाळा व्यवस्थापनाने त्याला निलंबित केले होते. मात्र तरीही शिक्षकाने न सुधारता आपल्या विद्यार्थिनीली मेसेज करून घरी बोलातले, त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
यापूर्वीही शिक्षकांनी केला होता असाच प्रतापकाही महिन्यांपूर्वी वरोरा शहरातील एका नामांकित शिक्षणसंस्थेतील दोन शिक्षकांनी माजी विद्यार्थिनीला आपल्या रूममध्ये बोलावले होते. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ माजली होती. त्यात दोन शिक्षकांना तातडीने निलंबित करण्यात आले. ही घटना ताजी असताना पुन्हा विकृत असलेल्या शिक्षकाने असाच प्रकार केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तो शिक्षक रत्नमाला चौक, राष्ट्रपती एपीजे कलाम चौक ते आनंदवन चौक या दरम्यान असलेल्या ले-आउटमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची वरोरा शहरात चांगलीच चर्चा रंगत आहे.
कठोर कारवाई केली असती तर...यापूर्वीही अशीच घटना घडली होती. तेव्हा संस्थेने या शिक्षकावर कठोर कारवाई केली असती तर पुन्हा असा प्रकार घडला नसता, असे सामान्य नागरिकांचे मत आहे. मात्र अनेक शिक्षण संस्थाचे पदाधिकारी आपल्याला तारखेवर कोर्टात उभे राहावे लागते, या कारणामुळे शिक्षकांवर कारवाई करणे टाळतात, याचाच फायदा काही विकृत शिक्षक घेत असल्याचे दिसून येते.