वकिलांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी व्हावा; सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2023 08:53 PM2023-08-14T20:53:11+5:302023-08-14T20:53:23+5:30

चंद्रपूर-गडचिरोली बार असोसीएशनच्यावतीने आयोजित कार्यक्रम संपन्न

The knowledge of lawyers should be used for the welfare of society; Appeal by Minister Sudhir Mungantiwar | वकिलांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी व्हावा; सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

वकिलांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी व्हावा; सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

googlenewsNext

चंद्रपूर: ज्ञानाचा उपयोग स्वतःसाठी न करता समाजाच्या कल्याणासाठी केल्यास खऱ्या अर्थाने तुमचे कार्य सार्थकी लागेल. कारण आपण सारेच समाजासाठी काहीतरी देणे लागतो, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
 
मुनगंटीवार म्हणाले, ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करून आपण शताब्दीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. या काळात देशाचा हॅपिनेस इंडेक्स ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरणार आहे. हा हॅपिनेस इंडेक्स धनावर अवलंबुन नाही. पैसा आवश्यक आहेच, पण त्यासोबत ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्रात झोकून देत आनंदाने काम करणेही महत्त्वाचे आहे. आयुष्यात यश प्राप्त करायचे असेल तर शास्त्र सांगतं त्याप्रमाणे अंतर्मनातून प्रयत्न करावे लागतात. आपण विधी शाखेत कार्यरत आहात आणि आपल्याला न्यायमूर्ती व्हायचे असेल तर अंतर्मनातून संकल्प करावा लागेल. जसे आईच्या हातून घरातल्या लाख वस्तू खाली पडतील पण तिच्या हातून दहा दिवसाचं चिमुकलं बाळ कधीच खाली पडत नाही. कारण ते बाळ तिच्या अंतर्मनात असतं. त्याचप्रमाणए आपणही अंतर्मनापासून सर्वस्व झोकून काम केले तर यश नक्कीच प्राप्त होणार.’ 

कुठलेही काम करताना प्रथा, परंपरा, शिष्टाचार याचाही विचार करावा लागतो. ‘मै और मेरा परिवार… बाकी सब बेकार’ अशी भूमिका ठेवून चालत नाही. आधुनिक काळात माणसाचे स्वार्थीपण वाढत आहे. लोकांना संविधानात आपल्यासाठी असलेले मुलभूत अधिकार माहिती आहेत, मात्र संविधानाने सोपविलेल्या जबाबदाऱ्यांचा विसर पडला. चांगल्या विचारांवरील कृतीची पवित्रता आपल्या आचरणातून वाढत असते. अशा आचरणाची आणि समाजाच्या कल्याणाची कृती आपल्याला करायची आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले. 

बार काऊन्सील ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या सहकार्याने चंद्रपूर-गडचिरोली बार असोसिएशनच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बार काऊन्सील ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष विवेकानंद घाटगे, उपाध्यक्ष उदय वारुंजीकर, सदस्य पारिजात पांडे, सीएलईपीचे अध्यक्ष संग्राम देसाई, सदस्य गजानन चव्हाण, प्रमुख पाहुणे ऍड. रविंद्र भागवत, राजेंद्र उमप, चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अभय पाचपोर, गडचिरोली जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र दोनाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कर्तृत्वाचा ठसा उमटवा

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांनी विधी शाखेत स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीपदाचे स्वप्न बघावे. तुमचे यश आकाशालाही हेवा करायला भाग पाडेल, अशी भावना मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. तसेच चंद्रपूर व गडचिरोली येथील विद्यार्थ्यांची निवड केल्याबद्दल बार काऊन्सीलचे त्यांनी अभिनंदनही केले.

Web Title: The knowledge of lawyers should be used for the welfare of society; Appeal by Minister Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.