अफगाणिस्तानात तणाव वाढला; इकडे ड्रायफ्रुट्स महागले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 05:00 IST2021-08-20T05:00:00+5:302021-08-20T05:00:53+5:30

सुकामेवा हे श्रीमंती खाणे समजले जाते. मात्र, कोरोनामुळे मध्यमवर्गीय व सामान्य कुटुंबेही पोषक तत्त्वे व आरोग्यासाठी सुकामेवा विकत घेऊ लागले. चंद्रपुरात अनेक ठिकाणी स्पेशल सुकामेव्याची दुकाने आहेत. तालुकास्थळी व ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये किराणा दुकानातच सुकामेवा विक्रीसाठी ठेवला जातो. सुकामेवा थोक विक्रीची राज्य आणि देशपातळीवर एक साखळी आहे. आंतरराष्ट्रीय उद्योग व्यवसायात काही अघटित घडल्यास त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर होतो.

Tensions rise in Afghanistan; Dried fruits are expensive here! | अफगाणिस्तानात तणाव वाढला; इकडे ड्रायफ्रुट्स महागले !

अफगाणिस्तानात तणाव वाढला; इकडे ड्रायफ्रुट्स महागले !

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपल्या सैनिक फौजा परत बोलावल्याने तेथील सरकार कोसळले आणि धर्ममार्तंड तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळविला. या देशातून भारतासह जगभरात सुकामेवा (ड्रायफ्रुट्स) पुरवठा केला जातो. तालिबान्यांमुळे तेथील परिस्थिती अराजक झाली. उद्योग-व्यापार क्षेत्रात अनिष्ट परिणाम होऊन सुकामेवा पुरवठ्याची साखळी तुटली. चंद्रपुरातही ड्रायफ्रुट्सच्या विक्रीत वाढ होत आहे, अशी माहिती व्यावसायिकांनी ‘लोकमत’ला      दिली.
सुकामेवा हे श्रीमंती खाणे समजले जाते. मात्र, कोरोनामुळे मध्यमवर्गीय व सामान्य कुटुंबेही पोषक तत्त्वे व आरोग्यासाठी सुकामेवा विकत घेऊ लागले. चंद्रपुरात अनेक ठिकाणी स्पेशल सुकामेव्याची दुकाने आहेत. तालुकास्थळी व ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये किराणा दुकानातच सुकामेवा विक्रीसाठी ठेवला जातो. सुकामेवा थोक विक्रीची राज्य आणि देशपातळीवर एक साखळी आहे. आंतरराष्ट्रीय उद्योग व्यवसायात काही अघटित घडल्यास त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर होतो. अफगाणिस्तानच्या पायाभूत विकासकामांसाठी भारताने मोठी गुंतवणूक केली. या देशाचा भारताशी व्यावसायिक संबंध आहे. विशेषत: सुकामेवा पुरवठा करण्यात अफगाणिस्तान आघाडीवर आहे. मात्र, अमेरिकेने आपले सैन्य माघारी घेतल्याने तेथील उद्योग स्थिती बदलली. त्याचे अनिष्ट परिणाम आता राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यातही दिसू लागले आहेत. 
सुकामेव्याच्या किमती वाढणे त्याचाच भाग असल्याचे चंद्रपुरातील व्यावसायिक गोविंद लालवानी व राजुरा, बल्लारपूर येथील विक्रेत्यांनी  ‘लोकमत’ला सांगितले.

नवीन ऑर्डर घेणे बंद 
- अक्रोड, काजू, खारीक, पिस्ता, बदाम, अंजिर, जर्दाळू व किसमिस खरेदीची नवीन ऑर्डर घेणे नागपुरातील मोठ्या व्यापाऱ्यांनी बंद केले. चंद्रपुरातील आठ-दहा व्यापाऱ्यांकडे आठवडाभर पुरेल इतकाचा सुकामेवा उपलब्ध आहे. हा स्टॉक संपल्यानंतर पुन्हा उपलब्ध होईल, याची खात्री नाही. बदामचे दर तर याच आठवड्यात प्रति किलो ३०० रुपयांनी वाढले. यापूर्वी ७०० रुपये किलो असा दर होता.

...तर दर पुन्हा भडकण्याची शक्यता 
सुकामेवा विकत घेणाऱ्यांची संख्या कोरोनापासून वाढली. तेव्हा दर कमी होते. काही ड्रायफ्रुट्सचा औषधीसारखा उपयोग केला जातो. स्थिर असलेल्या दरात दोन आठवड्यात अचानक वाढ झाली. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील व्यापार स्थिती बदलली नाही तर दर पुन्हा भडकू शकतात. स्थिती बदलणार काय, हे सांगता येत नाही.  
 - देवांश पंजवानी, 
व्यावसायिक, चंद्रपूर

ग्रामीण भागातील लहान दुकानदार चंद्रपुरातून सुकामेवा विकत घेतात. पण, आता दर वाढल्याने त्यांना गुंतवणूक अधिक करावी लागते. यासाठी हे दुकानदार रिस्क घेऊ इच्छित नाहीत. किमती वाढल्याने ग्राहक सुकामेव्याऐवजी दुसऱ्या वस्तूंना विकत घेतील, अशी स्थिती निर्माण झाली.
 - परमानंद कावडकर, 
किराणा व्यावसायिक, चंद्रपूर
 

 

Web Title: Tensions rise in Afghanistan; Dried fruits are expensive here!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.