विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षक उतरले आखाड्यात
By Admin | Updated: May 16, 2016 01:05 IST2016-05-16T01:05:14+5:302016-05-16T01:05:14+5:30
निकाल लागायला अद्याप बराच अवकाश आहे. पण विद्यार्थी मिळविण्यासाठी येथील शिक्षक आतापासूनच आखाड्यात उतरले आहेत.

विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षक उतरले आखाड्यात
नागभीड : निकाल लागायला अद्याप बराच अवकाश आहे. पण विद्यार्थी मिळविण्यासाठी येथील शिक्षक आतापासूनच आखाड्यात उतरले आहेत. विद्यार्थी व त्यांच्या पालकांना या शिक्षकांकडून विविध प्रलोभने देण्यात येत असल्याचा आरोपही यासंदर्भात होत आहे.
विद्यार्थ्यांच्या तुलनेत शाळांचीच संख्या अधिक असल्याचा अनुभव पदोपदी येत आहे. केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागातही हीच परिस्थिती आहे. दोन हजार लोकसंख्येच्या गावात दोन दोन माध्यमिक शाळा असल्याची उदाहरणे याच तालुक्यात आहेत. पुन्हा तीन-चार किलोमीटरवर आणखी एक माध्यमिक विद्यालय असल्याचे चित्रही याच तालुक्यात आहेत. परिणामी आपल्या शाळेची पटसंख्या कायम राहावी. यासाठी शिक्षकांनाच धडपड करावी लागत आहे, नव्हे गेल्या चार -पाच वर्षात ज्या शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यांच्यासमोर संस्थाचालकांनी हीच अट ठेवली होती असेही बोलले जात आहे.
नागभीड शहराचा विचार करता नागभीड येथे तीन उच्च माध्यमिक आणि एक खासगी प्राथमिक विद्यालय आहे. आता हे प्राथमिक विद्यालयसुद्धा यावर्षी आठवा वर्ग सुरू करीत आहे, अशी माहिती आहे आणि म्हणूनच विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकात स्पर्धा निर्माण झाली आहे. शिक्षकांसमोरची खरी अडचण पाचवीचे आणि आठवीचे विद्यार्थी मिळविणे ही आहे. एकदा विद्यार्थ्याने पाचवीत प्रवेश घेतला की दहावीपर्यंत कसलीच अडचण नाही आणि म्हणूनच हे विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांमध्ये चांगलीच चढाओढ असल्याचे दिसून येत आहे. यासाठी आमचीच शाळा कशी श्रेष्ठ आहे. आमच्या शाळेचा दर्जा कसा उत्तम आहे. हे तर वरकरणी पटवून देण्यात येत आहेच पण अंधारात वेगवेगळ्या सोयी सुविधांची आमिषे देण्यात येत आहेत, अशी वेगळी चर्चासुद्धा ऐकावयास मिळत आहे.
गमतीची गोष्ट अशी की, एका विद्यार्थ्याकडे दोन-दोन, तीन-तीन शाळेचे शिक्षक जात असल्याने विद्यार्थ्यांचे पालकही भांबावून गेले आहेत. मुलाला कोणत्या गुरुजीच्या शाळेत टाकू, असा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. हे दृश्य केवळ नागभीडमध्येच आहे, अशातला भाग नाही. ज्या ठिकाणी दोन व त्यापेक्षा अधिक शाळा आहेत, त्या प्रत्येक ठिकाणीच ही परिस्थिती आहे. त्यातल्यात्यात झपाट्याने फोफावत असलेल्या ‘कॉन्व्हेंट’ संस्कृतीचा थोड्याफार माध्यमिक विद्यालयांवर परिणाम जाणवू लागला असला तरी या संस्कृतीने प्राथमिक शाळांचीसुद्धा हालत खस्ता होत आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)