चारित्र्याच्या संशयातून दुर्गापुरात थरार; एकाची हत्या, तिघे गंभीर; भररस्त्यात झाला राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 21:24 IST2026-04-02T21:23:09+5:302026-04-02T21:24:01+5:30
बर्फ फोडण्याचा सुराच भोसकला

चारित्र्याच्या संशयातून दुर्गापुरात थरार; एकाची हत्या, तिघे गंभीर; भररस्त्यात झाला राडा
चंद्रपूर : चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादातून भररस्त्यात एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दुर्गापुरातील कोयना गेटजवळ घडली. यश हरिदास फाले (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात आरोपी प्रफुल चिमणकरसह मृत यशचे मित्र अंशुल रायपुरे, अभी रायपुरे (सर्व रा. ऊर्जनगर, वॉर्ड क्र. ५) हे जखमी झाले आहेत.
चिमणकर यांना पत्नीचे यशच्या वडिलांशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. सततच्या वादातून प्रफुल चिमणकर हे पत्नीपासून विभक्त राहत होते. बुधवार दि. १ एप्रिलच्या रात्री चिमणकर यांची पत्नी अचानक घरी आली, मात्र संशयाच्या कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. गुरुवारी सकाळी यश आपले मित्र अंशुल व अभी यांच्यासोबत कोयना गेट परिसरातील हनुमान मंदिरात जेवण करण्यासाठी गेला होता. तेथून परत येताना ते चिमणकर यांच्या नाश्ता सेंटरवर थांबले. तिघांनी लस्सीसुद्धा पिली. दरम्यान, यशने बुधवारच्या भांडणाचा चिमणकर यांना जाब विचारला. यावरून दोघांत बाचाबाची झाली. दरम्यान, यशने चिमणकर यांच्या डोक्यावर काचेचा ग्लास फोडला, तर चिमणकरने बर्फ फोडण्याचा धारदार सुरा यशच्या पोटात खुपसला. या वादात यशचे मित्रसुद्धा जखमी झाले.
वाटेतच सोडला दम
कोयना गेट परिसरात भांडण झाल्याची माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी गौरव कायंदेपाटील व त्यांचे पथक घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी यशला रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी चिमणकर याच्यावर हत्येचा गुन्हा, तर यशच्या मित्रांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी गौरव कायंदेपाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी 'लोकमत'ला दिली. पुढील तपास दुर्गापूर पोलीस करत आहेत.