४० पट कर आकारण्याच्या ‘त्या’ आदेशाला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:45 IST2018-03-12T23:45:05+5:302018-03-12T23:45:05+5:30
शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या जुन्या मालमत्तांना वाणिज्य वापरासाठी वापरल्याच्या कारणावरुन अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने काढलेल्या ४० पट कर आकारणीच्या आदेशाला राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्थगिती दिली.

४० पट कर आकारण्याच्या ‘त्या’ आदेशाला स्थगिती
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या जुन्या मालमत्तांना वाणिज्य वापरासाठी वापरल्याच्या कारणावरुन अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने काढलेल्या ४० पट कर आकारणीच्या आदेशाला राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्थगिती दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या या बैठकीत शहरातील व्यापारी शिष्टमंडळ सहभागी झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून वापरात असणाºया जुन्या मालमत्तांना अचानक मोठ्या प्रमाणात कर आकारणी करण्यात आली आहे. या संदर्भात शहरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. सोमवारी शिष्टमंडळाने भेट घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यामध्ये तोडगा काढावा, अशी मागणी केली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महपौर अंजली घोटेकर, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी अभय जोशी, जिल्हा खनिकर्म अधिकारी कामडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी व्यापारी व अधिकारी या दोघांशी चर्चा केल्यानंतर या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्यापाºयांना आपल्या नियमित वापराच्या मालमत्तेसाठी इतक्या मोठया प्रमाणात कर आकारणे योग्य नसून तूर्तास हा कर वसुलीस स्थगिती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. या निर्णयाबद्दल व्यापाºयांनी समाधान व्यक्त केले असून शासनाने योग्य पध्दतीने कर आकारणी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जलशुद्धीकरणासाठी पाच कोटी
चंद्रपूर शहरातील उन्हाळयातील पाण्याचे संभाव्य दूर्भिक्ष लक्षात घेता तातडीची पाणी पुरवठा लाईन टाकण्यासाठी व शहरात विविध ठिकाणी हातपंप, कुपनलिका, विहिरीवर पंप बसविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी महापौर अंजली घोटेकर यांनी केली होती. राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी आपल्या तातडीच्या दौºयात या निधीला मान्यता दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी घेतलेल्या तातडीच्या बैठकीत त्यांनी अधिकाºयांशी चर्चा करुन याबाबतचा निर्णय घेतला. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, स्थाई समिती सभापती राहुल पावडे, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी कामडे, नगरसेवक रवी आसवानी, राजू गोलीवार उपस्थित होते. यावर्षी शहर व जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली असली तरी शहरातील पाणी पुरवठा नियमित स्वरुपात व्हावा. त्यामध्ये अनावश्यक कपात करु नये, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यामुळे मार्च महिन्यातही महानगरामध्ये पाणी पुरवठा सुरळीत सुरु आहे. तथापि, आगामी काळात शहरामध्ये पाण्याची मागणी वाढणार असून त्यासाठी माडा जलशुध्दीकरण केंद्र ते रामनगर जलशुध्दीकरण केंद्र असे पाणी पुरवठयाचे काम करायचे आहेत. यासाठी तीन कोटी आठ लाख रुपये तर आवश्यकतेनुसार शहरातील विविध ठिकाणी हात पंप, कुपनलिका, विहीरवर पंप बसविण्याचे काम महानगरपालिकेने प्रस्तावित केले आहे. या कामासाठी निधी देण्याचे मान्य केले आहे.