लोकमत न्यूज नेटवर्कमासळ बु. : चिमूर तालुक्यातील मासळ बु येथील शेतकरी विरेंद्र बन्सोड यांच्या घरातील कापसाला अचानक आग लागली. यात त्याचा ६० टक्के कापूस जळून खाक झाला. सुदैवाने त्याचा १२ वर्षीय भाचा याच्या सतर्कतेने जिवितहानी टळली. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली.मासळ बु येथील शेतकरी विरेंद्र बन्सोड यांच्या दुमजली इमारतीत कापूस ठेवला होता. शुक्रवारी रात्री बन्सोड कुटुंबीय खालच्या मजल्यावर झोपून होते. पहाटे ४ ते ५ वाजताच्या दरम्यान, अचानक वरच्या मजल्यावर ठेवलेल्या कापसाला आग लागली. बन्सोड यांचा भाचा सकाळची शाळा असल्यामुळे तो वरच्या मजल्यावर आंघोळीसाठी गेला. यावेळी त्याला कापसाला आग लागल्याचे दिसून आले.त्याने लगेच आरडाओरड केल्याने शेजारी व बन्सोड कुटुंबीय वरच्या मजल्याकडे धावून आले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यत ६० टक्के कापूस जळून खाक झाला होता.यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. शासनाने पंचनामा करुन बन्सोड कुंटुबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
अचानक लागलेल्या आगीत कापूस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:40 IST