ग्रामीण भागात वादळाचा फटका
By Admin | Updated: May 8, 2014 01:45 IST2014-05-08T01:45:36+5:302014-05-08T01:45:36+5:30
गेल्या आठ दिवसांपासून रात्री-बेरात्री सुरू असलेल्या वादळाने गेल्या दोन दिवसापासून रौद्ररुप धारण केले आहे.

ग्रामीण भागात वादळाचा फटका
अनेक घरे पडली : जिवंत विद्युत तारा तुटल्या
वडाळा (खु.) : गेल्या आठ दिवसांपासून रात्री-बेरात्री सुरू असलेल्या वादळाने गेल्या दोन दिवसापासून रौद्ररुप धारण केले आहे. वादळी वार्यामुळे भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा, मुधोली, आष्टा या विभागातील अनेक घरे पडून कुटुंबाचे नुकसान झाले आहे.
या वादळासोबताच काही गावांना अकाली पाऊस व गारपिटीचा तडाखा सहन करावा लागला.गारपिटीचा तडाखा भाजीपाला उत्पादक शेतकर्यांना चांगलाच बसला असून पिकाचे नुकसान झाले आहे.
वादळी पावसामुळे विभागातील प्रत्येक गावात अनेक कुटुंबाच्या घरांचे छत, टिनपत्रे उडाली. काही घरांच्या भिंती पडल्या तर काही घरे कोसळून अनेक कुटुंब उघड्यावर पडले आहेत. तालुक्यातील काटवल (तु.), मुधोली, विलोडा, टेकाडी, कोंढेगाव, खुटवडा, सितारामपेठ, घोसरी, वडाळा, आष्टा, सोनेगाव, किन्हाळा, कोकेवाडा, या गावातील कुटुंब बाधित झाले आहेत. एकट्या काटवल (तु.) येथील जवळपास सात-आठ घरे कोसळली असून ३0 घरांवरील टिनपत्रे व छत उडून गेल्याची माहिती आहे.
त्यासोबतच शेतशिवारातील आंब्याच्या झाडांच्या फांद्या कोसळून आंबा पिकांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण ग्रामीण विभागातील अनेक ठिकाणी विद्युत खांबांना मार बसून व झाडे कोसळल्याने विद्युत तारा तुटल्या आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होत आहे. यामुळे जनता त्रस्त झाली आहे. विद्युत विभाग नियमित विद्युत पुरवठा सुरू ठेवण्याचे शर्तीचे प्रयत्न करीत असले तरी नियमितपणे विद्युत पुरवठा सुरू ठेवण्यात तेदेखील असर्मथ ठरत आहे. (वार्ताहर)