जिल्ह्याला पुन्हा वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 05:00 AM2020-05-11T05:00:00+5:302020-05-11T05:00:53+5:30

जिल्ह्यातील चंद्रपूर, गडचांदूर, कोरपना, बल्लारपूर, पळसगाव, तोहोगाव, आक्सापूर, गोंडपिपरी, ब्रह्मपुरी, पिंपळगाव, राजुरा, चिमूर, नेरी, नवरगाव परिसरात हा पाऊस पडला. राजुरा तालुक्यातील नदी पट्टयात रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास आलेल्या पाऊस आणि वादळाने बहुतांश गावातील घरांचे छप्पर उडाले. त्यामुळे क्षणार्धात काही कळायच्या आत नागरिकांचा संसार उघडयावर आला.

The storm hit the district again | जिल्ह्याला पुन्हा वादळाचा तडाखा

जिल्ह्याला पुन्हा वादळाचा तडाखा

Next
ठळक मुद्देअनेक घरांचे छप्पर उडाले, विद्युत खांबही पडले : रबी पिकांनाही जबर फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात सतत चवथ्यांदा वादळी पावसाचा तडाखा बसला. मे महिन्यात आतापर्यंत तीनदा जिल्ह्यात गिरपिटीसह वादळी पावसाने हजेरी लावत अनेकांचे मोठे नुकसान केले. दरम्यान, रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्ह्यातील अनेक भागात विजाच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली.
जिल्ह्यातील चंद्रपूर, गडचांदूर, कोरपना, बल्लारपूर, पळसगाव, तोहोगाव, आक्सापूर, गोंडपिपरी, ब्रह्मपुरी, पिंपळगाव, राजुरा, चिमूर, नेरी, नवरगाव परिसरात हा पाऊस पडला. राजुरा तालुक्यातील नदी पट्टयात रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास आलेल्या पाऊस आणि वादळाने बहुतांश गावातील घरांचे छप्पर उडाले. त्यामुळे क्षणार्धात काही कळायच्या आत नागरिकांचा संसार उघडयावर आला. घरातील सर्व अन्नधान्य भिजल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, चिंचोली(खु), गोयेगाव, कढोली(बू), चार्ली, निर्ली, धिडशी, मानोली, बाबापुर परिसरात आलेल्या वादळाने अक्षरश: चांगलाच तडाखा बसला. चिंचोली(खू) येथील किसन बल्की यांच्या घराचे छप्पर उडवून गेल्याने त्यांच्या घरात ठेऊन असलेला ४० क्विंटल कापूस भिजला. तर घरातील अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले आहे. तर केशव काळे यांचा शेतातील गोठा वादळाने उडून गेला. गोवरी येथील भास्कर लोहे यांच्या शेतातील गोठयाचे वादळाने नुकसान झाले. कढोली(बू) येथे वादळाने अनेक कुटुंबांची अक्षरश: दाणादाण केली. अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व वादळाने कढोली( बु.) येथे सर्वाधिक गावकऱ्यांचे नुकसान झाले. कढोली येथील प्रभाकर भोयर, परशुराम राऊत, लक्ष्मण हासे, संतोष मुक्के, चांगदेव खंगार, रामदास बोबडे यांच्या घरावरील टीन पत्रे उडाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले आहे. कढोली गावातील अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे अन्नधान्य पूर्णत: ओले झाले आहे. तसेच गावातील विजेचे खांबसुद्धा वाकले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून प्रशासनाने नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गोयेगाव येथे पाच जनावरे मृत्युमुखी
गोयेगाव परिसरात सकाळच्या सुमारास वादळाचा चांगलाच तडाखा बसला. यात विजेचे खांब वाकून काही ठिकाणी जिवंत वीज तारा तुटून खाली पडल्या. तारा तुटून असल्याची माहिती कुणालाही नव्हती. अशातच दुपारच्या सुमारास येथील एक शेतकरी शेतात जाण्यास निघाला असता वाटेतच त्यांना पाच जनावरे मृत्युमुखी पडलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी लगेच या घटनेची माहिती गावकºयांना दिली. या घटनेत हरिदास गौरकर यांच्या मालकीचे दोन बैल, विनोद पडवेकर यांच्या मालकीचा एक बैल, विलास मुसळे यांच्या मालकीची एक गाय, तर पुरुषोत्तम वनकर यांच्याही मालकीची एक गाय असे एकूण पाच जनावांचा मृत्यू झाला.

पोवनी येथे वीज पडून गाय ठार
राजुरा तालुक्यातील पोवनी येथे सकाळी ७ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यावेळी पोवनी येथील भूषण कावळे यांच्या मालकीच्या गायीवर शेतात चरत असताना अचानक वीज कोसळली. दुभती गाय अचानक मरण पावल्याने भूषण कावळे यांचे ३० हजार रुपयाचे मोठे नुकसान झाले.

२०० हून अधिक चिमण्यांचा मृत्यू
चिमूर : रविवारी सकाळी झालेल्या वादळी पावसाने चिमूर तालुक्यातील नेरी येथील मनोज मामीडवार यांच्या अंगणातील झाडावर असलेल्या २०० हून अधिक चिमण्यांचा मृत्यू झाला तर १५ चिमण्या जखमी झाल्या होत्या. त्यांना पाणी पाजून वाचवण्यात आले. चिमूर तालुक्यातील नेरी येथील जिल्हा परिषद सदस्य मनोज मामीडवार यांच्या अंगणातील झाडांवर त्यांचे वास्तव्य होते. रविवारी सकाळीच वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने या चिमण्या तग धरू शकल्या नाही आणि सडा पडावा तसे त्या झाडावरून खाली पडल्या. मामीडवार यांच्या अंगणात आंबा, फणस, रामफळ, लिंबू अशा विविध प्रकारच्या झाडांचा बगीचा असून यातील झाडावार मागील ५-६ वर्षांपासून ३०० ते ३५० चिमण्या दररोज सायंकाळी मुक्कामी असायच्या. मनोज मामीडवार यांनी दरवषीप्रमाणे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी भांड्यात पाणी ठेवत असतात. त्यामुळे त्याच्या अंगणात अनेक पक्षी वास्तव्य करतात. रविवारी पहाटे चिमूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटाचा पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावातील वृक्ष कोलमडून पडले. अनेक भागात विजेचे खांब पडल्याने वीज कंपनीचे अतोनात नुकसान झाले तर रात्रभर वीज पुरवठा बंद पडला होता.

वीज पडून दोन गाय व एक कालवड ठार
घोसरी : पोंभुर्णा शहरात व ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होवून मुसळधार पाऊस पडला. तालुक्यातील चेक बल्लारपूर येथे वीज पडून दोन गायींचा व एका कालवडीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास घडली. पोंभुर्णा तालुक्यातील चेक बल्लारपुरातील गायी चराईसाठी नदीकडे गेल्या होत्या. वादळी वाऱ्यासह, विजांचा कडकडाट होवून मुसळधार पाऊस सुरू झाल्याने गायी घराकडे परत येत असताना दोन गायीच्या व एक कालवडीच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. यातील एक गाय आणि एक कालवड मनोहर बल्की यांची तर एक गाय विक्की देवगडे यांच्या मालकीची होती.

Web Title: The storm hit the district again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.