खोडमाशीची प्रौढावस्था म्हणजे माशी अवस्था चमकदार काळ्या रंगाची व आकाराने लहान म्हणजेच दोन मि.मी. असते. या किडीची अंड्यातून निघालेली बिन पायाची अळी फिकट पिवळसर रंगाची असून ही अंड्यातून बाहेर पडल्यानंतर सोयाबीनची पाने पोखरतात आणि पानांच्या देठातून झाडाच्या मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून या फांदीचा किंवा खोडाच्या आतील भाग पोखरून खातात. अशा प्रकारचे प्रादुर्भावग्रस्त खोड चिरून पाहिल्यास आतमध्ये पांढुरक्या रंगाची अळी किंवा कोष आढळतो. या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनच्या रोपावस्थेत झाल्यास म्हणजे सोयाबीनची पेरणीनंतर १० ते १५ दिवसांचे पीक असताना झाल्यास, प्रादुर्भावग्रस्त झालेले झाड वाळते व झाडाच्या ताटाच्या संख्येवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे या खोडमाशीचे कृषी विभागाच्या सल्ल्याने व्यवस्थापन करावे, असे आवाहन राजुरा उपविभागातील कृषी अधिकारी एम. बी. मोरे यांनी केले आहे.
सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:23 IST