लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिकेच्या ६६ जागांसाठी भाजप व काँग्रेसमधील इच्छुकांच्या रुसव्याफुगव्यांनी स्थानिक नेत्यांच्या नाकात दम आणला होता. कुणी पाहून घेतो, असा दम दिला, तर कुणी नेत्यांना भर बैठकीतच खडेबोल सुनावले. नेत्यांकडून मनधरणी अन् आमिषांचा वर्षाव होऊनही पक्षातील इच्छुकांनी मंगळवारी (दि. ३०) अपक्ष म्हणून नामांकन दाखल करून बंड पुकारला. गटबाजीच्या वादातही भाजपने सामंजस्य ठेवून उमेदवारी दिली. मात्र, काँग्रेसच्या यादीत खासदार प्रतिभा धानोरकर यांचा वरचष्मा आहे. विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या खंद्या समर्थकांचे तिकीट कापल्याने अनेकांनी अपक्ष अर्ज दाखल करून आव्हान उभे केले आहे.
निवडणुकीत महानगरपालिका भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची मोठी रांग लागली होती. त्यातच पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वाद उफाळून आला होता. हा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला होता. अखेर निवडणूक प्रभारी तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूर व मुंबईत बैठकी झाल्या. दोन नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, उमेदवारी मिळेल की नाही, यावरून समर्थकांची धाकधूक वाढली होती. आज भाजपकडून नामांकन दाखल केल्यानंतर नऊ माजी नगरसेवकांना तिकीट नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.
तिकीट नाकारल्याने नंदू नागरकरांनी उतरवले स्वतंत्र पॅनल
काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने नंदू नागरकर यांनी महाकाली प्रभागातून सोमवारी (दि. २९) एकनिष्ठ जनसेवक परिवर्तन पॅनल तयार करून चार उमेदवारांसह नामांकन दाखल केले. ६६ उमेदवारांच्या यादीत खासदार प्रतिभा धानोरकर व जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या समर्थकांचा वरचष्मा असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरकर हे वडेट्टीवारांची सावली म्हणून चंद्रपुरात वावरत होते. त्यांचाच पत्ता कटल्याने मोठा धक्का मानला जात आहे. त्यांना उद्धवसेना-वंचित युतीने पाठींबा दिला आहे.
भाजपने नऊ माजी नगरसेवकांना नाकारले
मनपा स्थायी समितीचे माजी सभापती रवी आसवानी, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, राहुल घोटेकर, माजी नगरसेविका चंद्रकला सोयाम, माया उईके, शीला चव्हाण, वंदना तिखे, वंदना जांभूळकर, शीतल कुळसंगे यांना पक्षाने तिकीट नाकारले. निंबाळकर हे मुनगंटीवार तर तिखे या जोरगेवारांचे समर्थक आहेत.
घटकपक्षांना डावलून काँग्रेसने सोडल्या तीन जागा
काँग्रेसने जागा वाटपादरम्यान राकाँ (शरद पवार), उद्धवसेना, आरपीआय (खो.), वंचित बहुजन विकास आघाडीशी चर्चा केली होती. यातील एकाही पक्षाशी अखेरपर्यंत जुळवून घेतले नाही; परंतु जनविकास सेनेचे पप्पू देशमुख यांच्याशी संधान साधून वडगाव प्रभागातून काँग्रेसने तीन जागा सोडल्या आहेत.
मुनगंटीवार-जोरगेवार समर्थक समसमान
उमेदवारीवरून मुनगंटीवार व जोरगेवार समर्थकांमध्ये मोठा वाद झाला होता. मात्र, भाजपच्या यादीत दोनही नेत्यांच्या समर्थक उमेदवारांना समसमान संधी मिळाल्याचे दिसून आले. माजी महापौर राखी कंचर्लावार व अंजली घोटेकर यांनाही उमेदवारी मिळाली. ज्येष्ठ नेते हंसराज अहिर यांचे समर्थक माजी उपमहापौर अनिल फुलझेले यांना तिकीट मिळाले. दिग्गजांमध्ये भाजपचे शहर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टवार, स्थायी समितीचे माजी सभापती संदीप आवारी, राहुल पावडे, छबू वैरागडे, संजय कंचर्लावार यांचे तिकीट भाजपने कायम ठेवले आहे.
माजी नगरसेविकेचा भाजप निरीक्षकांसमोर गोंधळ
भाजपचे निवडणूक निरीक्षक आमदार चैनसुख संचेती यांनी मंगळवारी सकाळी एनडी हॉटेलमध्ये इच्छुकांची बैठक घेतली. तिकीट नाकारल्याने एका माजी नगरसेविकेने आमदार किशोर जोरगेवार यांना धारेवर धरून गोंधळ घातला. अखेर त्यांनी समजूत घातल्याने प्रकरण निवळले.
'त्या' बंडखोरांनाही काँग्रेसची उमेदवारी
काँग्रेसने महाविकास आघाडीतील एकाही घटक पक्षाशी युती केली नाही. मात्र, २०११ च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या ११ जणांनी बंडखोरी करून भाजपच्या सत्तेत सामील झाले होते. त्यातील काहींना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. भाजपचे राहूल घोटेकर यांनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेशच केला नव्हता. मात्र, त्यांनाही उमेदवारी मिळाली.
डच्चू मिळताच भाजपचे रवी आसवानी शिंदेसेनेत
भाजपने उमेदवारी नाकारताच रखी आसवानी यांनी जटपुरा ड प्रभागातून शिंदेसेनेकडून, तर राहुल घोटेकर यांनी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केली आहे. घोटेकर हे मागील निवडणुकीत जटपुरा प्रभागातून भाजपकडून विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसकडून पडवेकरांसह सात जणांचा पत्ता कट केला. आमदार विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक व माजी नगरसेवक नंदू नागरकर, विधानसभा निवडणूक लढविणारे प्रवीण पडवेकर, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया, प्रशांत दानव, सकिना अन्सारी, वीणा खणके यांना उमेदवारी डावलली. यातील दोन नगरसेवक वगळता सर्वच तीन टर्म विजयी झाले होते. समर्थकांना उमेदवारी मिळवून देण्यात वडेट्टीवारांना अपयश आल्याने चंद्रपुरात चर्चेचा विषय झाला आहे. सर्वांनी अपक्ष म्हणून नामांकन दाखल केले आहे.
Web Summary : Chandrapur municipal elections see disgruntled BJP & Congress workers file nominations as independents after being denied tickets. Factionalism and candidate selection disagreements led to internal strife, with some joining rival parties.
Web Summary : चंद्रपुर मनपा चुनाव में टिकट से वंचित भाजपा और कांग्रेस कार्यकर्ताओं ने निर्दलीय नामांकन दाखिल किया। गुटबाजी और उम्मीदवार चयन विवाद के कारण आंतरिक कलह हुई, कुछ विपक्षी दलों में शामिल हो गए।