सहा सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो

By Admin | Updated: September 10, 2014 23:32 IST2014-09-10T23:32:05+5:302014-09-10T23:32:05+5:30

आॅगस्ट महिन्यात अत्यंत चिंताजनक स्थितीत असलेल्या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी मिळाली आहे. सप्टेंबर महिन्यात पडलेल्या चार दिवसांच्या संततधार पावसामुळे ११ पैकी सहा प्रकल्प

Six Irrigation Projects Overflow | सहा सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो

सहा सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो

पाणी प्रश्न तूर्तास टळला : चार दिवसांच्या पावसाने सावरले
चंद्रपूर : आॅगस्ट महिन्यात अत्यंत चिंताजनक स्थितीत असलेल्या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी मिळाली आहे. सप्टेंबर महिन्यात पडलेल्या चार दिवसांच्या संततधार पावसामुळे ११ पैकी सहा प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्यामुळे पाणी प्रश्नासंदर्भात जिल्हा प्रशासनाची चिंता तूर्तास टळली आहे.
मागील वर्षी अतिवृष्टी करून चंद्रपूर जिल्हावासीयांना त्रस्त करून सोडणाऱ्या वरूणराजाने यावर्षी पावसाळाभर शेतकऱ्यांची परीक्षा घेतली. बोटावर मोजण्याइतक्या दिवसातच पाऊस पडला. तोही समाधानकारक नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करीत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. त्यानंतर आॅगस्ट महिना सुरू झाला तरी पावसाची चिन्ह नव्हती. त्यामुळे एरवी या कालावधीत तुडूंब भरली असलेल्या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात आॅगस्ट महिन्यात निम्माही जलसाठा नव्हता. परिणामी जिल्हा प्रशासनावर चिंतेचे सावट पसरले होते. उन्हाळाभर पाणी टिकविण्यासाठी पाण्याचे नियोजन कसे करावे, असा बिकट प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर होता. मात्र सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. सतत चार दिवस पाऊस कायम राहिला. त्यामुळे चिंताजनक स्थितीतील जलाशयांना अचानक नवसंजीवनी मिळाली. इरई धरणासह सहा प्रकल्प १०० टक्के भरले. इरई धरणातून सुरक्षेसाठी पाण्याचा विसर्ग केल्यानंतरही ९३.७७ टक्के पाणी आहे. नलेश्वर प्रकल्प, चंदई प्रकल्प, चारगाव प्रकल्प, लभानसराड व दिना प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. तर आसोलामेंढा प्रकल्पही ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पात ८१.४२ टक्के जलसाठा आहे. याशिवाय घोडाझरी ५५.१३ टक्के, अमलनाला ६७.८६ टक्के, पकडीगुड्डम ५५.०१ टक्के व डोंगरगाव प्रकल्प ७७.७९ टक्के भरला आहे. याशिवाय नदी-नाल्यांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने तुर्तास जिल्ह्यावर घोंघावणारे पाणी संकट दूर झाले आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Six Irrigation Projects Overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.