लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खनिज विकास निधी खर्चाच्या नियमांना बगल देत चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच वर्षात शेकडो कोटी रुपये नियमबाह्य खर्च करण्यात आल्याचा आरोप माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केला आहे. सोमवारी (१४ एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची जोरदार मागणी केली.
नियमांनुसार, खनिज विकास निधी प्रामुख्याने प्रकल्प क्षेत्राच्या १५ किमी परिसरात ७०टक्के आणि त्यालगतच्या १० किमी भागात ३० टक्के या प्रमाणात २५ किमी परिसरातच १०० टक्के निधी खर्च करणे आवश्यक आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात गत पाच वर्षात शेकडो कोटी निधी नियमबाह्य खर्च करण्यात आला. २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जिल्ह्यातील बँकांमध्ये ८६५ कोटी रुपये खनिज विकास निधी शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.
या निधीवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे व्याज मिळत असताना, इरई आणि झरपट नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी निधी का वापरला जात नाही, असा सवाल करत, नवीन पालकमंत्र्यांना निधीच्या वापराबाबत अंधारात ठेवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रपूर जिल्हा आर्थिकदृष्ट्या कमकुमत दाखवत जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार द्यावा असे आवाहन केले आहे. हे कितपत योग्य आहे, याकडेही पुगलिया यांनी लक्ष वेधले आहे.
झरपट व इरई पुनरुज्जीवनासाठी ३०० कोटी द्यावेचंद्रपूर महानगरपालिकेला दाताळा येथे इरई नदीच्या पुलाजवळ विसर्जन टाके निर्माण व सांडपाणी प्रकल्प दुरुस्तीकरिता कोट्यवधी रुपये मायनिंग रायल्टीमधून देण्यात येत आहे. असे असताना इरई व झरपट नदीच्या संरक्षण भिंत, बंधारे, खोलीकरण व सौंदर्याकरण व विकासासाठी ३०० कोटी का दिले जात नाहीत, याबाबत पालकमंत्री अशोक उईके यांना सविस्तर माहिती का दिली जात नाही, खनिज निधीचे ८६५ कोटी रुपये बँकेत जमा आहेत, ही बाब का लपवून ठेवली, चंद्रपूर जिल्ह्याला दारिद्रध जिल्हा भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे, हा जिल्ह्याचा अपमान आहे, असा आरोपही नरेश पुगलिया यांनी केला.
वेकोलिने तीन वर्षांत दिले ६०० कोटीमहाराष्ट्रात सर्वाधिक ४०० कोटींचा खनिज निधी दरवर्षी चंद्रपूर जिल्ह्याला मिळतो. यामध्ये चंद्रपूर, राजुरा, कोरपना, वरोरा व भद्रावती या तालुक्यांतून ८० टक्के वाटा वेकोलिचा आहे. २० टक्के वाटा सिमेंट कारखान्यांचा आहे. एकट्या वेकालिने मागील तीन वर्षात ६०० कोटी रुपये खनिज निधी दिला आहे. या भागातील आमदार याचा सदुपयोग करीत नाही हे दुर्दैव असल्याचे पुगलिया म्हणाले.