शेतकऱ्याची किडनी विक्री प्रकरणात एसआयटी गठीत ! मानवी अवयव तस्करीचे रॅकेट असल्याची शंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:25 IST2025-12-20T13:24:30+5:302025-12-20T13:25:43+5:30
Chandrapur : एक लाखाच्या अवैध सावकारी कर्जापासून सुरू झालेल्या प्रकरणात नागभीड तालुक्यातील रोशन कुळे या शेतकऱ्याला आठ लाखांत किडनी विकावी लागली.

SIT formed in farmer's kidney sale case! Suspected of human organ trafficking racket
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : एक लाखाच्या अवैध सावकारी कर्जापासून सुरू झालेल्या प्रकरणात नागभीड तालुक्यातील रोशन कुळे या शेतकऱ्याला आठ लाखांत किडनी विकावी लागली. या गंभीर प्रकरणाच्या तपासाला वेग देण्यात आला असून, यासाठी शुक्रवारी (दि.१९ रोजी) विशेष तपास पथक (एसआयटी) गठित करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी सर्वकष चौकशी करणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली.
या विशेष तपास पथकात उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मपुरी सत्यजीत आमले, स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक अमोल कचोरे व दोन पोलिस अधिकारी, सायबर पोलिस निरीक्षक सुनील गाडे, पोलिस निरीक्षक ब्रह्मपुरी प्रमोद बानबले यांचा समावेश आहे.
आणखी दोन संशयितांची नावे पुढे
या प्रकरणात किडनी काढण्याशी संबंधित डॉ. क्रिष्णा हे नाव आधीच तपासात पुढे आले असून, आता आणखी दोन संशयितांची नावे निष्पन्न झाल्याचे समजते.
या संशयितांची भूमिका काय होती, याबाबत तपास सुरू असून, वैद्यकीय कागदपत्रे आणि संपर्क साखळीची पडताळणी केली जात आहे.
शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचीही चौकशी
शुक्रवारी पोलिसांनी पीडित शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली. घटनेमुळे संपूर्ण कुटुंब हादरले असून, चौकशीदरम्यान संवेदनशीलतेची काळजी घेतली जात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. अटकेतील पाचही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
बँकांना नोटीस, त्या घटनास्थळाचा पंचनामा
सावकार आणि पीडित शेतकऱ्यामध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराची माहिती बँकांना नोटीस बजावून मागितली आहे. तसेच शेतकऱ्याला मारहाण केलेल्या घटनास्थळाचाही पंचनामा करण्यात आला आहे.
'लोकमत'च्या वृत्तांनी पोलिसांना मिळाली दिशा
कंबोडिया देशाशी जुळलेले हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी अवयव तस्करीच्या दिशेने जात असल्याची बाब सर्वप्रथम लोकमतने पुढे आणली. यानंतर खऱ्या अर्थाने तपासाची दिशा बदलली.
तपासाकडे लागले लक्ष
पीडित शेतकऱ्याने किती रक्कम घेतली, किती परतफेड केली, कोणत्या स्वरूपात पैसे दिले, याचा संपूर्ण आर्थिक हिशेब तपासला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात तपासातून जे निष्पन्न होईल, त्यानुसार पुढील कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणात एसआयटीच्या तपासाकडे आता सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. याप्रकरणात आतापर्यंत पाच सावकारांना अटक करण्यात आली. या सर्वांची पोलिस कोठडी २० एप्रिलला संपणार असून ती न्यायालयात वाढवून मागण्याची शक्यता आहे.