लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : साहेब, ऑक्सिजन बेड कुठे आहे, व्हेंटिलेटर कुठे मिळेल, कसं पण करा एक बेड मिळवून द्या, पैसा किती पण लागू द्या, नाही तर याचा जीव जाईल, अशा प्रकारचे एक ना शेकडो फोन येथील काॅलसेंटरमध्ये खणखणत आहेत. कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्ण जास्त आणि बेडची संख्या कमी अशी काहीशी अवस्था जिल्ह्यात बघायला मिळत आहे. परिणामी, प्रत्येक रुग्ण सुविधा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काॅलसेंटर सुरू केले असून या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाइकांना माहिती दिली जात असून त्यांना या माध्यमातून आधार मिळत आहे. दिवसा कमी फोन येत असले तरी काॅलसेंटरवर रात्रीच्या वेळी सारखा फोन खणखणत आहे.प्रत्येक रुग्णांचे नातेवाईक काळजीत आहेत. अनेकवेळा येथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळही करीत आहे. मात्र, जे-जे प्रयत्न करायला पाहिजे, ते-ते सर्व प्रयत्न येथील कर्मचारी करीत आहे. अधिकाधिक नातेवाईक बेड उपलब्धतेबाबत विचारपूस करीत आहेत. तर, रेमडेसिविर इंजेक्शनसाठीही अनेकांचे फोन येथे येत आहेत. त्यामुळे कर्मचारी उपलब्धतेनुसार त्यांना माहिती देत आहे. या कक्षामध्ये तीन शिफ्टमध्ये काम सुरू असून विविध विभागांतील २५ जण येथे आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतरही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कक्षासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनामध्ये वैद्यकीय अधिकारी डाॅ. किशोर भट्टाचार्य, विस्तार अधिकारी सांख्यिकी धनंजय पाल, भुषण लोहे यांच्यासह अन्य कर्मचारी कार्यरत आहेत.
ऐकण्याशिवाय पर्याय नाही
रुग्ण तसेच त्यांच्या कुटुंबीयांची गैरसोय होऊ नये, यासाठी काॅलसेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक जण काॅलसेंटरला फोन करतात. यामध्ये त्यांची अपेक्षा असते. मात्र, प्रत्येक वेळा त्यांची मागणी पूर्ण होईलच, हे सांगता येत नाही. जे-जे प्रयत्न काॅलसेंटरमधून करायला पाहिजे, ते पूर्ण केले जाते. मात्र, अनेकवेळा नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना ऐकून घेतल्याशिवाय पर्याय नसतो.
रुग्णांच्या नातेवाइकांकडून कोरोना काॅलसेंटरला फोन केल्यानंतर अनेकवेळा काही जण येथील कर्मचाऱ्यांना धमक्याही देत आहेत. यामध्ये बेड नाही तर येथे बसले कशाला, तुम्हाला पाहून घेईल, कुठे येऊ सांगा, यासोबत अर्वाच्य शब्दांत अनेकवेळा कर्मचाऱ्यांना बोलले जात आहे.
कुणाला ऑक्सिजन तर कुणाला इंजेक्शन हवेरुग्णसंख्या वाढत असून बेडसंख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे प्रत्येकाची सध्या धावपळ सुरू आहे. असे असतानाच काॅलसेंटरमधून मदत मिळेल, या आशेने कुणी ऑक्सिजन बेड तर काही जण रेमडेसिविरसाठी संपर्क साधत आहे. कर्मचारी माहिती घेऊन संबंधितांना कुठे काय याची माहिती देत आहे.
सेंटरमधून अशी मिळते मदतशासकीय, खासगी रुग्णालयांतील बेडची उपलब्धता, लसीकरणाचे स्थळ, कोरोना आजाराबाबत योग्य मार्गदर्शन, यासोबतच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना तसेच नव्याने कोरोनाबाधित आढळून आलेल्यांना दररोज फोनद्वारे त्यांच्या आरोग्याची माहिती घेतली जाते.