मिळायला हवे होते ५० हजार, खात्यात आले फक्त आठ ! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये भरपाई कमी मिळाल्याने संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 19:59 IST2025-10-29T19:56:46+5:302025-10-29T19:59:27+5:30
Chandrapur : शेतकऱ्यांना एका हेक्टरमागे पीक पेरणीचा खर्च जवळपास ५० हजार येतो. यामुळे अतिवृष्टीत झालेल्या नुकसानाची भरपाई ५० हजार मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Should have received 50 thousand, only eight came in the account! Rain-affected farmers angry over less compensation
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात गेल्या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये बल्लारपूर तालुक्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. संकटात सापडलेल्या तालुक्यांतील अतिवृष्टीग्रस्त ४ हजार २६५ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत देण्यासाठी शासनामार्फत मदतनिधी मंजूर करण्यात आला. काही शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला आहे. मात्र, मागणी ५० हजारांची असतानाही काही शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ ८ हजार ५०० रुपये जमा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांना एका हेक्टरमागे पीक पेरणीचा खर्च जवळपास ५० हजार येतो. यामुळे अतिवृष्टीत झालेल्या नुकसानाची भरपाई ५० हजार मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु, शासनाने एका हेक्टरमागे ८ हजार ५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी आहे.
बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम आजघडीला तालुका प्रशासनामार्फत सुरू आहे. आतापर्यंत २ हजार ७०० च्या जवळपास याद्या उपलोड करण्यात आल्या आहेत. तर मदतीची रक्कम दिवाळीच्या दिवशी काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. इतरांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात बल्लारपूर तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक नुकसान गेल्या ऑगस्टमध्ये ३ हजार ५६७ शेतकरी व सप्टेंबर महिन्यात ६९८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
पोर्टलवर याद्या अपलोड
मंजूर मदतीची रक्कम अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीत जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम तहसील कार्यालयामध्ये १८ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले असून, आतापर्यंत २ हजार ७००च्या वर याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत. याद्या अपलोड करणे सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात बल्लारपूर तालुक्यात ३५ गावांतील ३ हजार ५६७ शेतकऱ्यांची ३ हजार ६२९.९३ हेक्टर शेती अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झाली.
या गावांमध्ये नुकसान
सप्टेंबरमध्ये ६९८ शेतकऱ्यांच्या शेतीतील पीक नष्ट झाले. यामध्ये धान २०२ हेक्टर, कापूस ३ हजार ८५ हेक्टर, सोयाबीन ११६ हेक्टर व तूर २२५ हेक्टर शेतमालाचे नुकसान झाले. जास्त नुकसान झालेल्या काटवली, आमडी, किन्ही, दुधोली, चारवट, पळसगाव, दहेली, कोठारी, कवडजई, बामणी, नांदगाव पोडे, हडस्ती, विसापूर या गावांचा समावेश आहे.
"पुरामुळे आमच्या शेतात दोन हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याची नोंद केली. परंतु, एक हेक्टरचे ८ हजार ५०० रुपये खात्यात जमा झाले."
- आबाजी देरकर, दहेली, ता. बल्लारपूर