लाेकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढून बिकट होत चाललेली आहे. आरोग्य यंत्रणाही कोलमडल्यागत झाली आहे. दररोज दीड हजारांच्या आसपास नवे रुग्ण डिटेक्ट होत आहे. त्या तुलनेत बेडची संख्या नसल्याने चंद्रपुरातील सर्व शासकीय रुग्णालयांतील व खासगी कोविड सेंटरमधील बेड फुल्ल झाले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडा भासत आहे. त्यामुळे गंभीर रुग्ण आणखी गंभीर होत मृत्यूच्या दिशेने जात आहेत. यासोबतच सौम्य व मध्यम लक्षणे असलेेल्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या फेव्हीपिरॅव्हीर व इतर औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे. जे रुग्ण गृहअलगीकरणात आहेत, त्या घरातील सदस्य आपणही पॉझिटिव्ह होऊ, या भीतीने गरज नसतानाही इतर औषधी आधीच विकत घेऊन ठेवत आहेत. उलट ही औषधी मिळत नसल्याने भरती रुग्णांचा रुग्णालयात मुक्काम वाढत आहे. परिणामी, बेड्सची कमरता जाणवत आहे. आतील रुग्ण बाहेर येईनात आणि बाहेरील गंभीर रुग्णांना बेड मिळेना, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
माझ्या एका नातलगाला कोरोनाची बाधा झाल्याचे कोरोना चाचणी केल्यानंतर स्पष्ट झाले. त्याला गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. मात्र, चंद्रपुरात खासगी कोविड सेंटर व शासकीय कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनयुक्त बेड नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.- दुर्योधन कांबळे, चंद्रपूर.
कोविड १९ बाधित झालेल्या रुग्णाला डॉक्टरांना गृह विलगीकरणाचा सल्ला दिला आहे. त्यासाठी काही औषधे लिहून दिली आहे. यात फेबीफ्लू औषधीचाही समावेश आहे. मात्र, या गोळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. बल्लारपुरातील सर्व मेडिकलमध्ये जाऊन आल्यानंतर केवळ एक दिवसाचाच डोस देण्यात आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा गोळी घेऊन जा असा सल्ला मेडिकल संचालकाकडून दिला जात आहे. एक गोळी घ्यायला रुग्ण मेडिकलमध्ये किती फेऱ्या मारणार आहे, हाही प्रश्न आहे. - अमोल गेडाम, बल्लारपूर