शिवाजी महाराजांचे स्वराज्य राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक
By Admin | Updated: February 20, 2017 00:26 IST2017-02-20T00:26:31+5:302017-02-20T00:26:31+5:30
शिवाजी महाराजांच्या पदरी विविध जाती-धर्माचे सरदार व सैनिक होते. त्यांनी हिंदू धर्मगुरूंप्रमाणे मुस्लीम संतांचाही सन्मान केला आहे.

शिवाजी महाराजांचे स्वराज्य राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक
ताहेर भाई : ३८७ व्या छत्रपती शिवाजी महाराज जयतींचा सोहळा
चंद्र्रपूर : शिवाजी महाराजांच्या पदरी विविध जाती-धर्माचे सरदार व सैनिक होते. त्यांनी हिंदू धर्मगुरूंप्रमाणे मुस्लीम संतांचाही सन्मान केला आहे. त्यांच्या एकही मुस्लीम सरदार किंवा सैनिकाने त्यांच्याशी कधी गद्दारी केली नाही. छत्रपतींचे स्वराज्य हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक होते, असे प्रतिपादन पुणे येथील प्रसिद्ध विचारवंत ताहेर भाई यांनी रविवारी येथे केले.
मराठा सेवा संघातर्फे तुकूम येथील संघाच्या नवीन वास्तूमधील सभागृहात शिवाजी महाराजांच्या ३८७ व्या जयतींचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ताहेर भाई बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुधाकर अडबाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर ऋषीजी कोंडेकर, डॉ. सचिन भेदे, संजय आल्लूरवार, डॉ. अनुप वासाडे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा लता होरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ताहेर भाई म्हणाले की, औरंगजेबाने शिवाजी महाराजांशी नऊ वर्षे लढा दिला. परंतु या काळात शिवाजींच्या स्वराज्याचा आकार वाढतच गेला. औरंगजेबाने ९ मार्च १६६८ रोजी शिवाजीचे राजापद मान्य केले. महाराजांचे अंगरक्षक रुस्तम-ए-जमाल व सिद्दी इब्राहिम होते. छत्रपती शिवाजींच्या सैन्यात मदारी मेहतर, हिरोजी फर्जद, सिद्दी जोहर, शिवा काशिद, इब्राहिम खान असे विविध मुस्लीम सरदार व सैनिकांचा भरणा होता. त्यांचे वकील काजी हैदर होते. नूरखान बेग यांच्यासारखे सेनापती होते. रायगडाचे बांधकाम पाहण्यासाठी शिवाजी महाराज गेले होते. तेथे हिंदू धर्मियांसाठी व्यवस्था करण्यात आल्याचे दिसले. त्यावेळी त्यांनी सुक्ष्म निरीक्षण करून मुस्लीम रयतेसाठीही व्यवस्था करण्याचा आदेश दिला.
त्यांचे राष्ट्रीय एकात्मतेचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण एकमेकांच्या धर्माचा, एकमेकांच्या परंपरांचा आदर केला पाहिजे. कोणी म्हणत असेल की, हिंदू धर्म श्रेष्ठ आहे तर कोणी म्हणत असेल की, मुस्लीम धर्म श्रेष्ठ आहे. पण ते तितकेसे खरे नाही. खरा श्रेष्ठ धर्म मानवता धर्म आहे. मानव धर्माचे आपण पालन केले पाहिजे. शिवाजी महाराजांना समानतेची शिकवण राजे शहाजी व माँसाहेब जिजाऊ यांनी दिली होती. त्यांच्याच वारसा शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी यांनी चालविला. संभाजी राजांनी तीन भाषांमध्ये ग्रंथ रचना केली. बुद्धभूषण हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिला. हा त्यांनी मनुस्मृतीचा गुन्हा केला. त्यामुळे त्यांचा बहादूरगडावर खून करण्यात आला, असा दावाही ताहेर भाई यांनी केला. याप्रसंगी आरोही फुलझेले या विद्यार्थिनीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत दिलेले इंग्रजी भाषेतील भाषण म्हणून दाखविले. प्रास्ताविक दीपक जेऊरकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत गोखरे यांनी आणि आभार प्रदर्शन अलका टोंगे यांनी केले. कार्यक्रमाला सुरेश अडवे, गिरीधर काटवले, सुरेश माळवे, प्रभाकर ढवस, अतुल टोंगे, डॉ. सचिन बोधाने आदींसह अनेकजण उपस्ति होते. (प्रतिनिधी)
शिवरायांच्या विचारांवर धर्मनिरपेक्ष राज्यघटना
यावेळी ताहेर भाई यांनी सांगितले की, शिवरायांनी धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वत:च्या जीवनात पाळले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिवरायांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धर्मनिरपेक्ष राज्यघटना देशाला दिली. त्या दोघांच्याही आजोबांचे नाव मालोजी होते. बदलापूर व बेळगाव येथील शिवजयंती कार्यक्रमात डॉ. आंबेडकरांनी व्याख्यान दिले. शिवाजी महाराज अधिक काळ जगले असते तर त्यांची शिवधर्माची संकल्पना समाजात रुजली असती, असेही त्यांनी स्पष्ट केले.