श्रमिक एल्गारचे मजुरांसह सावलीत आंदोलन
By Admin | Updated: May 7, 2014 01:58 IST2014-05-07T01:58:16+5:302014-05-07T01:58:16+5:30
तालुक्यातील अंतरगाव येथील मजुरांना नियमित कामे मिळत नसल्याने व कामाची मजुरीही वेळेवर मिळत

श्रमिक एल्गारचे मजुरांसह सावलीत आंदोलन
कामाची मागणी : पंचायत समितीत मजुरांचा ठिय्या
सावली : तालुक्यातील अंतरगाव येथील मजुरांना नियमित कामे मिळत नसल्याने व कामाची मजुरीही वेळेवर मिळत नसल्याने श्रमिक एल्गारच्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात सावली पंचायत समितीत ठिय्या आंदोलन करण्यात आले. अंतरगाव येथील मजुरांनी १ एप्रिलला नमुना ४ अंतर्गत कामाची मागणी केली. परंतु १५ दिवसांत काम मजुरांना काम देण्यात आले नाही. त्यामुळे मजुरांनी बेरोजगार भत्याची मागणी केली. भत्याची मागणी करताच, मजुरांना कामे देण्यात आली. परंतु सदर काम नियमित न देता ई-मस्टरचे कारण सांगून मध्येच बंद करण्यात आले. मजुरांना जानेवारीपासून मजुरी मिळाली नाही. काही मजुरांची मोजमाप पुस्तिकेत नोंदच करण्यात आली नाही. या मजुरांच्या समस्या घेऊन पंचायत समितीमध्ये आंदोलन करण्यात आले. यामुळे पंचायत समितीमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आंदोलकांसोबत चर्चा करण्यात येऊन ई-मस्टर मजुरांना तयार करून देण्यात आले व काम देण्यात आले. मजुरी ८ दिवसांत देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. सदर आंदोलन अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात करण्यात आले. आंदोलनात विजय कारेवार, अनिल मडावी, रामचंद्र हुलके, भास्कर आभारे, किरण शेंडे यांच्यासह मजुर सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)