Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 14:55 IST2025-12-16T14:53:48+5:302025-12-16T14:55:51+5:30
Chandrapur : मिंथुर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी सांगितले की त्यांनी काही वर्षांपूर्वी दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपये सावकाराकडून कर्ज घेतले होते. रोशन कुडे यांच्याकडे चार एकर शेती असून त्याच शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.

Sell Kidney but pay my debt ! Farmer sells kidney for 8 lakhs on moneylender's advice; goes to Cambodia for surgery
चंद्रपूर : नुकतेच नागपूर येथे झालेले हिवाळी अधिवेशन विदर्भाच्या प्रश्नांवर खास लक्ष देण्यासाठी आयोजित केले गेले होते पण विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांची अवस्था मात्र बदलायला तयार नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथुर गावात एक अत्यंत गंभीर व संतापजनक घटना समोर आली आहे. येथे कर्जासाठी एका शेतकऱ्याला सावकाराच्या दबावाखाली स्वतःची किडनी विकावी लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना संपूर्ण राज्यात शेतकरी संकट आणि सावकारीच्या अतिरीक्त व्याजवसुलीचा गंभीर प्रकार समोर आणते.
मिंथुर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी सांगितले की त्यांनी काही वर्षांपूर्वी दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपये सावकाराकडून कर्ज घेतले होते. रोशन कुडे यांच्याकडे चार एकर शेती असून त्याच शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, सततच्या नैसर्गिक प्रतिकूलतेमुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे उत्पन्नाचा दुसरा मार्ग शोधत त्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. दुग्ध व्यवसायातून काहीतरी हाताशी लागेल या आशेने त्यांनी गाई खरेदी केल्या.
या गाई खरेदीसाठी त्यांनी दोन सावकारांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये, असे एकूण एक लाख रुपयांचे कर्ज घेतले. परंतु दुर्दैवाने खरेदी केलेल्या गाई मरण पावल्या आणि शेतीही पिकली नाही. परिणामी, कर्जाचा भार अधिकच वाढत गेला. कर्जवसुलीसाठी सावकार वारंवार त्यांच्या घरी येऊन मानसिक त्रास देऊ लागले. या कर्जातून मुक्त होण्यासाठी रोशन कुडे यांनी दोन एकर जमीन विकली, तसेच ट्रॅक्टर आणि घरातील मौल्यवान साहित्यही विकावे लागले. तरीसुद्धा कर्जाची रक्कम फेडता आली नाही.
भरमसाठ आणि बेकायदेशीर व्याजामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. एका लाख रुपयांवर दररोज दहा हजार रुपयांप्रमाणे व्याज आकारले जात असल्याने सुरुवातीचे एक लाख रुपयांचे कर्ज वाढत जाऊन तब्बल ७४ लाख रुपयांपर्यंत पोहोचले.
शेवटी या भीषण परिस्थितीत रोशन कुडे सावकाराच्या सल्ल्यानुसार कोलकाता आणि नंतर कंबोडियात जाऊन आपल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी ८ लाख रुपयांमध्ये स्वतःची किडनी विकली. याबद्दल त्यांनी सावकारावर कायद्याने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या घटनेने स्थानिक आणि प्रदेशभरात खळबळ उडवली असून, शेतकऱ्यांच्या दुःखद परिस्थितीकडे प्रशासन आणि नागरिकांचे लक्ष वेधले आहे. या प्रकारामुळे राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची अवस्था, सावकारांकडून घेतल्या जाणाऱ्या उधारी व अत्याधिक व्याजाचा दुष्परिणाम किती गंभीर आहे हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. आता राज्य सरकार आणि कृषी मंत्री या प्रकरणात कोणती तपासाची पावले उचलतील आणि संबंधित सावकाराला किती शिक्षा होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.