स्कॅन केलेल्या नोटा बाजारात
By Admin | Updated: February 18, 2017 00:38 IST2017-02-18T00:38:13+5:302017-02-18T00:38:13+5:30
नोव्हेंबर महिन्यत चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या.

स्कॅन केलेल्या नोटा बाजारात
दुकानदारांमध्ये घबराट : संगणकाद्वारे हातचलाखी
वरोरा : नोव्हेंबर महिन्यत चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या. त्याऐवजी नवीन २ हजार रुपये व ५०० रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या आहे. त्याचा फायदा घेत संगणकाने स्कॅनिंग केलेल्या नोटा मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये चालविल्या जात असल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळे दुकानदारांमध्ये व नागरिकांमध्ये चांगलीच भीती पसरली आहे.
सध्या २ हजार, ५००, १०० रुपयाच्या नोटांना नागरिक मोठ्या प्रमाणात वापरीत आहे. सध्या या नोटा नवीन असल्याने बनावट नोट ओळखणे सामान्य नागरिकांना कठीण जात आहे. मागील काही दिवसांपासून संगणकावरून स्कॅन केलेल्या २ हजार, ५०० व १०० रुपयांच्या नोटांनी चलनात शिरकाव केल्याचे दिसून येत आहे.
गर्दी असलेल्या दुकानात या नोटा चालविल्या जात असल्याचे समजते. गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी चिल्लर घेवून स्कॅन केलेल्या नोटा दिल्या जात असल्याचे मानले जात आहे.
संगणकावर स्कॅन केलेल्या नोटाचा कागदसुद्धा बनावट असल्याचे दिसून येते. एखाद्या विक्रेत्यास व नागरिकास संगणकावर स्कॅन केलेली नोट ग्राहकाकडून मिळाल्यास ती बँकेत जमा करताना घेतली जात नाही. त्यांच्यामागे तपासाचा ससेमीराही लागण्याची शक्यता असल्याने संगमक स्कॅन नोट चुकून आल्यास नागरिक व विक्रेते गप्प बसत आहेत. त्यामुळे संगणकृत स्कॅन नोटा चालविणाऱ्याचे फावत आहे. (तालुका प्रतिनिधी)
स्कॅन नोटेवर गांधीजींचे छायाचित्र नाही
संगणकावरून स्कॅन करून चलनात आणलेल्या नोटेवरील पांढऱ्या रंगात महात्मा गांधीचे छायाचित्र दिसत नाही. स्कॅन नोटेचे सुक्ष्म अवलोकन केले असता अनेक तफावती आढळून येत आहे. परंतु गर्दीमधून रक्कम घेताना नोटा बारकाईने बघता येत नसल्याने संगणकावरील स्कॅन केलेल्या नोटा चलनात आणण्याची हिंमत दिवसागणिक वाढत आहे.
२०१४ मधील दोन्ही नोटांमध्ये तफावत
२०१४ मधील दोन नोटा पाहिल्या असता संगणकावर स्कॅन केलेल्या नोटेवर सुब्बाराव आणि खऱ्या १०० च्या नोटेवर गर्व्हनर रघुराम जी. राजन यांचे नाव व स्वाक्षरी असल्याचे दिसून येते.