तब्बल सहा तास चालले वाघाचे रेस्क्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:01 IST2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:01:11+5:30

या वाघास ताब्यात कसे घ्यायचे, यावर वनविभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी बरेच विचारविनिमय केले. पण कोणताच मार्ग दिसत नव्हता. वाघ बघायला आलेले लोकही हटत नव्हते. निदान जाळ्यात येईल म्हणून वाघ ज्या घरात बसला होता, त्या घराभोवती जाळे टाकण्यात आले. पण वाघ बाहेर पडण्याचे नाव घेत नव्हता.

The rescue of the tiger lasted for six hours | तब्बल सहा तास चालले वाघाचे रेस्क्यू

तब्बल सहा तास चालले वाघाचे रेस्क्यू

ठळक मुद्देवाघाची रवानगी गोरेवाड्यात : वाघ जेरबंद होताच नागरिकांचा जीव भांड्यात

घनश्याम नवघडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : तालुक्यातील बाम्हणी येथे भरदिवसा घरात घुसलेल्या त्या वाघाला ताब्यात घेण्यासाठी तब्बल सहा तास शिकस्त करावी लागली. शेवटी रात्री १० वाजताच्या सुमारास त्याला बेशुद्ध करूनच जेरबंद करण्यात आले.
रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास हा वाघ घरात घुसल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. घरात घुसलेल्या या वाघाचे फोटो काही व्यक्तींनी सोशल मीडियावर व्हायरल केले आणि बघता बघता ही माहिती पंचक्रोशीत पोहचली. आणि कळायच्या आत या वाघाला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. दरम्यान वनविभागालाही ही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी महेश गायकवाड ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. पोलीसही आले. गर्दीला पांगविण्याचे बरेच प्रयत्न केले. पण ते निष्फळ ठरले. घरात दडून असलेल्या या वाघाने एकदा बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. पण समोर असलेल्या लोकांच्या गर्दीमुळे परत माघारी वळला.
या वाघास ताब्यात कसे घ्यायचे, यावर वनविभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी बरेच विचारविनिमय केले. पण कोणताच मार्ग दिसत नव्हता. वाघ बघायला आलेले लोकही हटत नव्हते. निदान जाळ्यात येईल म्हणून वाघ ज्या घरात बसला होता, त्या घराभोवती जाळे टाकण्यात आले. पण वाघ बाहेर पडण्याचे नाव घेत नव्हता. शेवटी सदर वाघास बेशुद्ध करून जेरबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे वरिष्ठांना कळविण्यात आले व वरिष्ठांकडून मदत मागण्यात आली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार या वाघाला बेशुद्ध करण्यासाठी रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान ट्रँक्यूलायझर टीम ताडोबा येथून निघाली व ९.३० वाजता बाम्हणी येथे पोहचली. रात्री १० वाजता या वाघास बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यात आले. १५ मिनिटांत वाघ बेशुद्ध झाल्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आले. दरम्यान रविवारी रात्री उपवन संरक्षक कुलराज सिंह, सहायक उपवन संरक्षक आर.एम. वाकडे हेही घटनास्थळी हजर झाले आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच त्या वाघाचे रेस्क्यू करण्यात आले. नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात वाघाला सोडण्यात आले.

तालुक्यात वाघ आहेत किती ?
१९ जून रोजीच नागभीडलगत असलेल्या तुकूम येथील एका व्यक्तीस वाघाने ठार केले होते. या घटनेच्या वृत्ताची शाई वाळत नाही, तोच रविवारी वाघाने बाम्हणी येथे चक्क घरात ठाण मांडले. एवढेच नाही तर तालुक्यातील पाहार्णी, गिरगाव, कचेपार, बाळापूर, मिंडाळा, घोडाझरी आदी परिसरात वाघाबद्दलच्या चर्चा नेहमी कानावर येत असतात. यावरून नागभीड तालुक्यात किती वाघांचे वास्तव्य आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या शेतीचा हंगाम जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत वाघांच्या अशा घटना घडत गेल्या तर त्या शेतकºयांसाठी अडचणीच्या ठरणार आहेत.

‘तो’ वाघ नाही वाघीण
बाम्हणी येथील श्रीकांत देशमुख यांच्या घरात ठाण मांडलेली वाघीण होती. तिचे वय झाले होते आणि तिच्यात अशक्तपणा दिसत होता. म्हणून तिच्यावर अधिक उपचार व्हावेत, यासाठी नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात हलविण्याचा निर्णय वनविभागाने घेतला.
 

Web Title: The rescue of the tiger lasted for six hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल