गोंडवाना संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By Admin | Updated: February 27, 2016 01:22 IST2016-02-27T01:22:08+5:302016-02-27T01:22:08+5:30
बोगस आदिवासींची प्रकरणे उघडकीस आणणाऱ्या नांदेड येथील प्रामाणिक आणि कर्तव्यतत्पर अपर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्यावर बदलीची कार्यवाही झाल्यास

गोंडवाना संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
चंद्रपूर : बोगस आदिवासींची प्रकरणे उघडकीस आणणाऱ्या नांदेड येथील प्रामाणिक आणि कर्तव्यतत्पर अपर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्यावर बदलीची कार्यवाही झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा येथील गोंडवाना संघटनेने दिला आहे.
डॉ. राजेंद्र भारूड यांनी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती औरंगाबाद यांच्या मदतीने गैरआदिवासी (बोगस) लोकांच्या जातीचे खोटे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देणारे रॅकेट उघडकीस आणले. ही कारवाई ही बोगस आदिवासींना जाचक वाटत आहे. आणि म्हणूनच या कार्यवाहीचा बदला घेण्यासाठी गैरआदिवासी वेगवेगळ्या भागात मोर्च, धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाची दिशाभूल करीत आहेत. एवढेच नव्हे तर शासनावर राजकीय दबाव आणून डॉ. राजेंद्र भारुड यांच्या बदलीसाठी युद्धपातळीवर काम करीत आहे.
अशी कुठलीही कारवाई कर्तव्य तत्पर अधिकाऱ्यावर करण्यात येऊ नये, अशी मागणी संघटनेने केली असून यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. शिष्टमंडळात गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज आत्राम, गोंडवाना विद्यार्थी संघटने जिल्हाध्यक्ष प्रा. धिरज शेडमाके, प्रवीण आडेकर आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)