संततधार पावसाने शेतकरी वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:34 AM2019-08-09T00:34:09+5:302019-08-09T00:34:45+5:30

मागील दोन आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अधेमधे एक दोन तासांचा अपवाद वगळला तर पावसाची रिपरिप अविरत सुरूच आहे. त्यामुळे आता शेतकरी वैतागला आहे. शेताच्या बांद्यात पाणी साचून हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली आहेत.

The rains overwhelmed the farmers | संततधार पावसाने शेतकरी वैतागले

संततधार पावसाने शेतकरी वैतागले

Next
ठळक मुद्देआता हवी उसंत : हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील दोन आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अधेमधे एक दोन तासांचा अपवाद वगळला तर पावसाची रिपरिप अविरत सुरूच आहे. त्यामुळे आता शेतकरी वैतागला आहे. शेताच्या बांद्यात पाणी साचून हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली आहेत. सततच्या पावसामुळे शेतीची कामेही बंद आहे. आता पावसाने उसंत घ्यावी, अशी आर्त मागणी शेतकरी करू लागले आहेत.
यावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिला पाऊस पडला. त्यानंतर चार-पाच दिवस ढगाळ वातावरण कायम राहिले. मात्र पुढे पावसाने दडी मारली. तब्बल २२ दिवस पाऊस आलाच नाही. २९ जुलैपासून जिल्ह्यात पुन्हा मान्सून सक्रीय झाला. तेव्हापासून आज ८ आॅगस्टपर्यंत पावसाची संततधार सुरुच आहे. अधेमधे एक-दोन तासाची विश्रांती सोडली तर पावसाची रिपरिप कायम आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, अंधारी, उमा, शिरणा, खोडदा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील अनेक मार्गावरून वाहणाऱ्या नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे काही मार्ग बंद झाले आहेत.
शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस व धानाची पेरणी केली आहे. धानाचे पऱ्हे जोमात असतानाच संततधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे हजारो हेक्टरवरील धानाचे पऱ्हे पाण्याखाली आहेत. पावसाने उसंत घेतली नाही तर हे पऱ्हे उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांना आॅगस्ट महिन्यात दुबार पेरणी करावी लागणार आहे.
आज गुरुवारी जिल्ह्यात एकूण २३५ मिमी पावसाची नोंद झाली. सरासरी १५ मिमी पाऊस झाला. आज सावली तालुक्यात सर्वाधिक ३८.२ मिमी पाऊस पडला. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ६७७.१८ मिमी पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत ही टक्केवारी ५४.८३ आहे. आता पुढील पाच दिवस पुन्हा पावसाचे असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
१५ जनावरे वाहून गेली
आक्सापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून गोंडपिपरी तालुक्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले, तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. अशातच तालुक्यातील सोमनपल्ली-कोंढाणा लगतच्या पुलावरून पाणी वाहत असताना सायंकाळच्या वेळी घरी परतणारी १५ जनावरे वाहून गेली. ही घटना बुधवारी घडली. यात मृत पावलेली तीन जनावरे बाहेर काढण्यात आलीत तर तीन ते चार जनावरे पुलाखालीच अडकल्याची माहिती आहे. ४-५ जनावरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली असल्याची माहिती गावकºयांनी दिली. जनावरे पुरात वाहून जाण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी तालुक्यातील धाबा पुलावरून आठ जनावरे वाहून गेल्याची घटना घडली होती. मागील कित्येक वर्षांपासून हा पूल नव्याने बांधावा, अशी गावकरी मागणी करीत आहे. मात्र सातत्याने निराशाच पदरी पडत आहे. सोमनपल्ली, कोंढाणा, चेकसोमनपली, हेटी सोमनपल्ली येथील शाळकरी मुले, शेतकरी व नागरिक नेहमी याच नाल्यातून वाट काढत जातात. पूर असला की मग धाबा मार्गे ३-४ किमी अंतर पार करून जावे लागते. आपादग्रस्त पशुपालकांना शासनाने आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी आहे. पाण्यात वाहून गेलेली जनावरे ही दिवाकर बोरकुटे, मंजुलाबाई नागपुरे, सुधाकर ठाकूर, राजू भोयर, मिलींद कुबडे, मोरेश्वर ठोंबरे यांच्या मालकीची आहेत.
इरई धरणाचे पाच दरवाजे उघडले
दुर्गापूर: संततधार पावसाने इरई धरण तुडूंब भरले असून धरणाचे पाच दरवाजे ०.५ मीटरने गुरुवारी दुपारी उघडण्यात आले आहेत. यापूर्वी १ आॅगस्टला धरणाचे दरवाजे ०.२५ मीटरने उघडले होते. जुलै महिन्याच्या अखेरच्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने अखेर इरई धरण तुडूंब भरले आहे. चारगाव धरणाचा ओव्हरफ्लो सुरु असल्याने त्याचेही पाणी इरई धरणात येत आहे. त्यामुळे इरई धरणातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आधी १ आॅगस्टला, त्यानंतर ५ आॅगस्टला सातही दरवाजे उघडण्यात आले होते. आज गुरुवारी पुन्हा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहे. इरई नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुढील पाच दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी होऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

खडसंगी - मुरपार मार्ग बंद
चिमूर : परिसरात सुरू झालेल्या संततधार पावसाने खडसंगी - मुरपार - मिनझरी मार्गावरील खोडदा नदीचे पात्र लहान असल्याने पूर आला आहे. परिणामी मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. मागील पंधरवड्यापासून आतापर्यंत या नदीच्या पुलावरून पाणी वाहण्याची ही सहावी वेळ आहे. नदीच्या पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने बुधवार रात्रीपासून मुरपार व मिनझरी गावाला जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग गुरुवारी वृत्त लिहिपर्यंत बंद होता. परिणामी मार्गावरून ये- जा करणाºया नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागून होत्या. वेकोलिचे अनेक कामगार खाणीपर्यंत पोहचू शकले नाही. खोडदा नदीच्या पुलाची उंची कमी असल्याने या पुलाला पावसाळ्यात अनेकदा पूर येत असतो.

Web Title: The rains overwhelmed the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.