चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पावसाचा फटका
By Admin | Updated: September 9, 2014 23:21 IST2014-09-09T23:21:27+5:302014-09-09T23:21:27+5:30
मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यातील पावसाने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला झटका दिला आहे. गेल्या दोन दिवसातील पावसाने येथील उत्पादन खालावले असून ते ३५० मेगावॅटवर घसरले आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पावसाचा फटका
वीज संकट : उत्पादन ३५० मेगावॅटवर खालावले
चंद्रपूर : मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यातील पावसाने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला झटका दिला आहे. गेल्या दोन दिवसातील पावसाने येथील उत्पादन खालावले असून ते ३५० मेगावॅटवर घसरले आहे.
या विद्युत केंद्राची निर्मितीक्षमता २ हजार ३४० मेगावॅटची आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसाने आणि विजेच्या कडकडाटामुळे ५०० मेगावॅट क्षमतेच्या सहाव्या क्रमांकाच्या संचात बिघाड निर्माण झाला. यामुळे उत्पादन ठप्प झाले आहे. ५०० मेगावॅट क्षमतेच्या सातव्या क्रमांकाच्या संचात व्हायब्रेशन सुरू झाल्याने हा संचही बंद करण्यात आला आहे. २१० मेगावॅट क्षमतेच्या तिसऱ्या क्रमांकाच्या संचाचा बॉयलर ट्यूूब लिकेज झाल्याने हा संचही बंद पडलेला आहे. तर, २१० क्षमतेचा संच क्रमांक एक नियमित देखभालीच्या कारणासाठी बंद आहे. आज ५०० मेगावॅट क्षमतेचा पाचव्या क्रमांकाचा संचही काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. या संदर्भात सीएसटीपीएसचे जनसंपर्क अधिकारी विष्णु ढगे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, बंद करण्यात आलेले युनिट तीन तासात सुरू करण्यात आले. सातव्या क्रमांकाच्या संचाच्या दुरूस्तीसाठी नागपुरातून तंत्रज्ज्ञांची चमू बोलाविण्यात आली होती. सध्या एक, तीन आणि पाच या क्रमांकाचे तीन संच तांत्रिक कारणामुळे बंद आहेत. त्यामुळे उत्पादन खालावले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)