खाटेवर खिळलेल्या रुग्णांच्या लसीकरणाचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:29 IST2021-03-23T04:29:56+5:302021-03-23T04:29:56+5:30
कोरोना प्रतिबंधासाठी ६० वर्षे, तसेच ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त व्यक्तींना लस घेताना अडचणी येऊ नये, याकरिता सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण ...

खाटेवर खिळलेल्या रुग्णांच्या लसीकरणाचा प्रश्न गंभीर
कोरोना प्रतिबंधासाठी ६० वर्षे, तसेच ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त व्यक्तींना लस घेताना अडचणी येऊ नये, याकरिता सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांतही कक्ष सुरू झाले. जिल्ह्यात सद्य:स्थितीत ७१ केंद्रांवर प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी प्रत्येक केंद्राला उद्दिष्ट देण्यात आले. शिवाय, लसीकरण करण्याची वेळही वाढवून देण्यात आली. त्यामुळे नोंदणी केलेल्या हेल्थ केअर वर्कर व फ्रन्ट लाईन वर्करचे लसीकरण उद्दिष्ट लवकरच पूर्ण होणार आहे. ६० वर्षांवरील नागरिक व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिक कोरोना प्रतिबंधक डोस घेत आहेत. मात्र, दीर्घ काळापासून घरीच खाटेवर असणाऱ्या व्याधीग्रस्त नागरिकांना केंद्रात जाऊन लस घेणे शक्य होत नाही. अशा रुग्णांना डोस देण्याबाबत आरोग्य प्रशासनाकडे सद्य:स्थितीत काहीच पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे ज्या घरात व्याधीग्रस्त व्यक्ती बऱ्याच वर्षांपासून खाटेवरच पडून आहे, अशा कुटुंबीयांची लसीकरणाअभावी घालमेल सुरू आहे.
एका बाधितामागे ३० जणांचे ‘कॉन्टक्ट ट्रेसिंग’
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात कॉन्टक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आला. एकाला कोविड १९ ची बाधा झाल्यास सुमारे ३० व्यक्तींची तपासणी करणे अत्यावश्यक असल्याचे वैज्ञानिक तज्ज्ञांचे मत आहे.
‘हाय रिस्क’ची संख्या धडकी भरविणारी
चंद्रपूर जिल्ह्यात कॉन्टक्ट ट्रेसिंगची गती विदर्भातील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत पुढे आहे. मात्र, हाय रिस्क श्रेणीतील एक लाख ५७ हजार ०१ नागरिकांची संख्या धडकी भरविणारी आहे. त्यामध्ये दीर्घ आजारामुळे घरीच खाटेवर कणत, पण केंद्रात जाऊन डोस घेण्याची क्षमता नसणाऱ्यांचाही समावेश आहे.
लसीकरणाच्या निर्णयावर प्रशासनाला मर्यादा
लसीकरणाबाबत जिल्हा प्रशासनाला स्वतंत्र निर्णय घेण्यावर मर्यादा आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाचेच पालन करावे लागते. त्यामुळे काही पर्याय निघेल काय, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहेत.
कोट
दीर्घ काळापासून घरीच खाटावर असणाऱ्या व्याधीग्रस्तांच्या घरी जाऊन प्रतिबंधक लस देण्याबाबत शासनाकडून गाईडलाईन्स नाहीत. हा विषय बैठकीतही चर्चेत आला हाेता. अशा व्यक्तींना केंद्रात येण्यासाठी व्हीलचेअर अथवा तत्सम सुविधा उपलब्ध करून देता येईल.
- अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर.
कोट-
बऱ्याच कालावधीपासून आजारी अवस्थेत घरीच खाटेवर असणाऱ्यांना न चुकता लस घेण्याची गरज आहे. घरी लस घेतल्यानंतर प्रकृतीत काही अनिष्ट परिणाम झाले तर काय ? त्यामुळे सध्याचा पर्यायच नागरिकांनी स्वीकारावा. केंद्रात जाऊनच डोस घ्यावा.
- डॉ. संदीप गेडाम, जिल्हा लसीकरण अधिकारी, चंद्रपूर