आरटीओ विभागाचा भोंगळ कारभार : अधिकारी म्हणतात, कार्यवाहीला वेळ लागेलचंद्रपूर : येथील आरटीओ कार्यालयातील भोंगळ कारभार उजेडात येताच अधिकाऱ्यांनी ड्रायव्हिंग स्कूल संचालकाला नोटीस बजावून खुलासा मागण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे आणखी किती जणांवर कारवाई केली जाणार, याकडे लक्ष लागले आहे. ११ मे २०१५ रोजी ब्रह्मपुरी येथे पार पडलेल्या शिबिरात अनेकांची कागदपत्र गोळा करण्यात आली. मात्र सहा महिने लोटूनही परवाने वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे ब्रह्मपुरीचे प्रा. राजेश गजपूरे यांनी प्रकरणाची आरटीओ कार्यालयात चौकशी केली असता, त्यांचे कागदपत्रे गहाळ असल्याचे उजेडात आले. त्यानंतर कागदपत्र मिळविण्यात आले. मात्र कागदपत्रे गहाळ झालेच नसल्याचा कांगावा अधिकारी करीत आहेत. मग कागदपत्र गहाळ झालीच नाही तर सहा महिने लोटूनही परवाने का मिळाले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘लोकमत’ने सदर प्रकार उजेडात आणताच अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. एकमेकांकडे बोट दाखवत तसा प्रकार घडलाच नसल्याचे सांगत आहेत. मात्र लोकमतकडून या प्रकरणाचा सतत पाठपुरावा सुरू असल्याने २२ जानेवारीला सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ड्रायव्हिंग स्कूल संचालकाला नोटीस बजाविण्याचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यामुळे या प्रस्तावावर काय कार्यवाही होते आणि कार्यवाहीला किती दिवस लागतात, याकडे लक्ष लागून आहे. (स्थानिक प्रतिनिधी)तक्रारकर्त्यांला परवाना नेण्यासाठी फोनसदर प्रकार उजेडात येताच आरटीओ विभागात खळबळ उडाली आहे. कागदपत्रांचा शोध घेण्यात आला. १९ जानेवारीला सहायक उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी कागदपत्राची तपासणी करून परवान्यावर स्वाक्षरी केली. मात्र या कागदपत्रावर शिबिर प्रमुखानी १८ ते १९ जानेवारीला शिबिराच्या दिवशीची तारिख टाकून स्वाक्षरी केली, असे खुद्द अधिकाऱ्याने प्रतिनिधीला सांगितले. त्यानंतर २० जानेवारीला शिबिर प्रमुखांनी प्रा. गजपूरे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून ‘तुम्हचा परवाना तयार झाला आहे, येऊन घेऊन जा’ असे सांगितले. तेव्हा गजपूरे यांनी ‘बॉयहॅन्ड लायसन्स’ देण्याची प्रथा केव्हापासून सुरू झाली असे म्हणताच, पोस्टाने पाठविले जाईल, असे शिबिर प्रमुखाने सांगितले.
ड्रायव्हिंग स्कूल संचालकावर कारवाईचा प्रस्ताव
By admin | Updated: January 23, 2016 01:05 IST