ताडोब्यातील प्रगणकांची मचाण पडली
By Admin | Updated: May 15, 2014 01:05 IST2014-05-15T01:05:06+5:302014-05-15T01:05:06+5:30
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणामुळे वन्यप्राणी प्रगणनेसाठी गेलेल्या दोन प्रगणकांना मचाण पडल्याने जखमी व्हावे लागले.

ताडोब्यातील प्रगणकांची मचाण पडली
चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणामुळे वन्यप्राणी प्रगणनेसाठी गेलेल्या दोन प्रगणकांना मचाण पडल्याने जखमी व्हावे लागले. ही घटना आज बुधवारी कोअर झोनमधील मोहर्ली वनपरिक्षेत्रातील गिरघाटजवळ दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास घडली.
अप्रतिम दिक्षित व योगेश मनसाने अशी जखमी प्रगणकांची नावे आहेत. दोघांनाही अनेक तासानंतर चंद्रपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पडलेली मचान जमिनीपासून ३0 फुट उंच होती. जखमी अप्रतिम यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही प्रगणक मचान पडल्यानंतर सुमारे दीड तास तिथेच पडून होते. त्यानंतर एक गाईड घटनास्थळपासून काही अंतरावर गेला. सुदैवाने वनविभागाचे वाहन तिथे होते. त्यानंतर वायरलेसवर याची माहिती विभागाला देण्यात आली. त्यानंतर सुमारे एका तासानंतर वनविभागाचे वाहन घटनास्थळी पोहचले. उल्लेखनीय असे की घटनास्थळ कोअर झोनमधील मोहर्ली गेटच्या अगदी जवळ होते. वनविभागाला व्यवस्थित नियोजन करता येत नसेल तर नागरिकांना प्रगणनेसाठी का बोलविले जाते, हीच घटना रात्री घडली असती तर काय झाले असते, असा प्रश्नही दीक्षित यांनी उपस्थित केला.
घटनेनंतर दोन्ही जखमींना पाणी हवे होते. पण त्यांना पाणी मिळाले नाही. काही अंतरावर एक पाण्याची बॉटल पडून होती. जखमीपैकी एकाला ती दिसली. त्यानंतर दोघेही वेदनाशमक गोळी खाऊन तिथेच पडून होते. (शहर प्रतिनिधी)