एक एकरातील हळदीपासून अडीच लाखांचे उत्पादन
By Admin | Updated: February 18, 2017 00:42 IST2017-02-18T00:42:24+5:302017-02-18T00:42:24+5:30
येथील सुशिक्षित तरुण शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वत:च्या वडिलोपार्जित एक एकर शेतीत पारंपरिक शेती नाकारुन हळद पिकाची लागवड केली.

एक एकरातील हळदीपासून अडीच लाखांचे उत्पादन
तरुण शेतकऱ्यांचा उपक्रम : हळद उकळण्याचे उपकरण स्वत:च केले तयार
कोठारी : येथील सुशिक्षित तरुण शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वत:च्या वडिलोपार्जित एक एकर शेतीत पारंपरिक शेती नाकारुन हळद पिकाची लागवड केली. यात त्यांना अडीच लाखांचे विक्रमी उत्पादन झाले. यातून त्यांना शुद्ध दोन लाख रूपयांचा नफा मिळाला आहे. अशोक भास्करराव मोरे असे शेतकऱ्याचे नाव आहे. आधुनिक पद्धतीने शेती करुन आत्मनिर्भर होण्याचा महत्त्वपूर्ण प्रेरणादायी संदेश तरुणांना दिला आहे.
अशोक मोरे यांच्याकडे वडोलोपार्जीत चार एकर शेती आहे. बी.ए.पास असलेल्या अशोकने नोकरीसाठी अनेकदा प्रयत्न केले. त्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. मात्र त्याला यश आले नाही. केवळ आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने तो नाकारला गेला. मात्र तो खचून न जाता आधुनिक शेती करण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्याने शेतीचे आत्मा अंतर्गत प्रशिक्षण घेतले. कृषी सहाय्यक निब्रड, मंडळ कृषी अधिकारी वरभे व आत्माचे कृषी अधिकारी धानोरकर यांनी अशोकला हळदीचे पीक घेण्यासाठी मार्गदर्शन केले व अशोकने एक एकर शेतीवर हळीचे उत्पादन घेण्यासाठी तयारी केली. त्यात तो यशस्वी झाला.
एक एकर शेतीसाठी त्याने ४० हजार रूपयााचा खर्च केला. त्यापासून अडीचलाखाचे उत्पादन घेत शुद्ध दोन लाखाचा नफा मिळविला. त्यासाठी त्याने स्वत:सह त्याची पत्नी मनिषा वडील व आईने कठोर मेहनत घेतली. पारंपारीक शेतीपेक्षा आधुनिक शेती करुन हळदीच्या पिकांपासून तो आत्मनिर्भर झाला. त्यांचा इतरही शेतकऱ्यांनी प्रेरणा घेण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
६० हजारांचे उपकरण १२ हजारात तयार
हळद उत्पादन घेतल्यानंतर त्यास उकळून बाजारात विकावे लागते. सदर उपकरणाची किंमत ६० हजार रुपये आहे. परंतु अशोकने नागपूर जवळील वायगाव येथे जावून हळद शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या उपकरणाची पाहणी केली. मात्र तयार उपकरणाच्या खरेदीसाठी पैसे नसल्याने त्याने उपकरण स्वत:च तयार करण्याची योजना आखली. त्यांनी स्थानिक साहित्य वापरुन १२ हजारात उपकरण तयार करुन त्यात हळद उकळतो आहे. अशोक मोरे ३० वर्षाच्या तरुण सुशिक्षित शेतकऱ्यांचा प्रयत्न तरुणांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरत आहे. त्याची दखल कृषी अधिकाऱ्यांनी घेत त्यासाठी लागणारी सर्व माहिती व मदत करीत आहेत. तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा आधुनिक शेतीकडे गेले पाहिजे. कृषी तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध लोकोपयोगी शेती करुन स्वत:सह कुटुंबाला आर्थिक मजबूत केले पाहिजे. त्यासाठी कृषी विभागाकडून माहिती घेवून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अशोक मोरे यांनी केले आहे.