चंद्रपूर : मागील पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बलात्काराच्या आरोपीला अखेर सावली पोलिसांनी गुरुवारी (दि. २ एप्रिल) अटक केली. साईनाथ श्यामराव वासेकर (४०, रा. पिपरी देशपांडे, ता. पोंभुर्णा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.
सन २०१६ मध्ये सावली पोलिस स्टेशनच्या हद्दीत बलात्काराचे प्रकरण घडले होते. या प्रकरणी साईनाथवर कलम ३७६ (२), (आय), ५०६ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. सुरुवातीला काही दिवस तो न्यायालयीन तारखेला हजर राहिला; मात्र, त्यानंतर मागील पाच वर्षांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. पोलिस त्याच्या मागावर होतेच; पण, तो वारंवार आपली ठिकाणे बदलत होता. दरम्यान, साईनाथ हा मागील १५ दिवसांपासून मूल तालुक्यातील आकापूर येथे नाव बदलून गुप्तपणे भाड्याने खोली घेऊन राहत असल्याची माहिती सावली पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच त्यांनी तातडीने पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.
नदीच्या पात्रातून पलायन अन् थरार...
ठाणेदार प्रदीप पुल्लुरवार, पीएसआय सचिन मुसळे यांच्या मार्गदर्शनात पो.हवा. मट्टामी, पो.हवा. शुक्ला, पोलिस अंमलदार धीरज पिदुरकर यांची चमू आकापूर येथे पोहोचली. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच साईनाथने उमा नदीच्या पात्रात उडी घेतली आणि झाडाझुडपांचा आश्रय घेत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. आरोपी निसटण्याची शक्यता वाटल्याने पोलिसांनी तातडीने सावली पोलिस ठाण्यातून अतिरिक्त कुमक बोलावली.
जंगलात 'सर्च ऑपरेशन'
आरोपी घनदाट जंगलात शिरल्याने पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली. अतिरिक्त मदतीसाठी तीन पोलिस हवालदार आणि सहा पोलिस अंमलदार घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी संपूर्ण जंगलाला घेराव घालून जवळपास दोन किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. अखेर शिताफीने लपून बसलेल्या साईनाथच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, एसडीपीओ सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रदीप पुल्लुरवार, पीएसआय सचिन मुसळे, पो.हवा. मट्टामी, पो.हवा. शुक्ला, पोलिस अंमलदार धीरज पिदुरकर व सावली पोलिसांच्या चमूने केली.