परप्रांतीय बांबू कामगार तीन दिवसांपासून उपाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2016 00:57 IST2016-02-26T00:57:36+5:302016-02-26T00:57:36+5:30
वनविकास महामंडळातील झरण वनपरिक्षेत्रात बांबू कटाई करणाऱ्या परप्रांतीय मजुरांना आठवडी बाजारासाठी पगार न दिल्याने गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी चुलीच पेटविल्या नाही...

परप्रांतीय बांबू कामगार तीन दिवसांपासून उपाशी
वनविकास महामंडळातील प्रकार : पगारासाठी जंगलातच मजुरांचा ठिय्या
कोठारी : वनविकास महामंडळातील झरण वनपरिक्षेत्रात बांबू कटाई करणाऱ्या परप्रांतीय मजुरांना आठवडी बाजारासाठी पगार न दिल्याने गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी चुलीच पेटविल्या नाही व उपाशीपोटी जंगलात ठिय्या मांडून बसल्याचा प्रकार निदर्शनास आला. अन्नाविना तडफडणाऱ्या मजुरांकडे कोणी अधिकारी व कर्मचारी लक्ष देण्यास तयार नसल्याने ९० ते १०० मजूर कोठारी जवळील अडेझरी नाल्यावर रात्रदिवस काढत होते. हा अमानविय प्रकार गोंडपिंपरीचे राजेश कवठे, अरुण वापलवार यांना समजताच त्यांनी तातडीने मजुरांना अन्न पाण्याची व्यवस्था केली. या संतप्त प्रकाराने माणसातील माणूसकी हरविल्याची व मजुरांच्या शोषणाची गंभीर समस्या उघड झाली.
मध्यप्रदेशातील बालाघाट येथील दीड ते दोन हजार मजूर मध्य चांदा वनविकास महामंडळाच्या वनपरिक्षेत्रात बांबु कटाईचे कामे गेल्या तीन महिन्यांपासून करीत आहेत. आता बांबू कटाईचे कामे अंतिम टप्प्यात असून काम पूर्ण झालेल्या मजुरांना पूर्ण पगार घेवून घराकडे परतीचे वेध लागले आहे. या मजुरांना आवठडी बाजारासाठी २०० ते ३०० रुपये अॅडवान्स देण्यात येते. मात्र मागील दोन आठवड्यात मजुरांना पैसे देण्यात आले नाही. परिणामी मजुर धान्य, भाजीपाला व किराणा खरेदी केला नाही.
त्यामुळे कामगार तीन दिवसांपासून उपाशी होते. या प्रकाराची माहिती होताच राजेश कवठे व अरुण वासलवार यांनी घटनास्थळावर त्वरीत दाखल झाले. मजुरांची परिस्थिती पाहून संताप व्यक्त करीत मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केली. कोठारीचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम, गोंडपिंपरीचे तहसीलदार मलिक विराणी, अडेझरीत दाखल झाले. वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना प्रकाराची माहिती दिली. मात्र याकडे कुणीही फिरकून पाहिले नाही. अखेर झरण क्षेत्राचे वनाधिकारी अजय पवार व प्रफुल्ल निकोडे हे मजुरांना वेतन देण्यासाठी गुरूवारी दुपारी २ वाजता आले व पगार वितरीत केला. (वार्ताहर)