Chandrapur Crime: चंद्रपूरातील बल्लारपूर येथे नंदीग्राम एक्स्प्रेसच्या शौचालयात एका प्रवाशाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना शनिवारी दुपारी १:३० वाजता बल्लारशाह रेल्वेस्थानकावर उघडकीस आली. मृतक व्यक्तीकडे कोणतेही सामान नसल्याने रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. जीआरपी पोलिसांनी मृतदेह बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
मुंबईहून येणारी नंदीग्राम एक्स्प्रेस (क्र. ११००१) ही गाडी दुपारी सुमारे १:२० वाजता बल्लारपूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ०५ वर पोहोचली. या गाडीची सी अँड डब्ल्यू विभागाने नेहमीप्रमाणे अंतर्गत तपासणी सुरू केली. दरम्यान, कोच क्रमांक एस ३ मधील उजव्या बाजूच्या शौचालयाचे दार आतून बंद आढळून आले. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दार आतून बंद असल्याने उघडले गेले नाही.
ही माहिती तत्काळ स्टेशन प्रबंधक व रेल्वे जीआरपी पोलिसांना देण्यात आली. जीआरपीचे अरविंद शाह व पथक दाखल झाले. त्यांनी शौचालयाचे दार तोडले असता आतमध्ये एका व्यक्तीने कपड्याच्या साहाय्याने पाण्याच्या टाकीच्या पाइपाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्या व्यक्तीला खाली उतरवून रेल्वे डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मात्र त्या व्यक्तीकडे कोणतेही ओळखपत्र नसल्याने त्याच्याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. रेल्वे स्थानकावर घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं.