पटावर ७०, प्रत्यक्षात केवळ ७ विद्यार्थी; चंद्रपूर जिल्ह्यातील वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 15:40 IST2019-12-11T15:37:16+5:302019-12-11T15:40:00+5:30
कागदोपत्री खोटी आकडेवारी दाखवून कोट्यवधींचे अनुदान आश्रमशाळांच्या माध्यमातून लाटण्याचा एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे.

पटावर ७०, प्रत्यक्षात केवळ ७ विद्यार्थी; चंद्रपूर जिल्ह्यातील वास्तव
आशिष देरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विमुक्त जाती, भटक्या जाती, इमाव व विमाप्र समाजकल्याण मंत्रालयामार्फत चंद्रपूर जिल्ह्यात २५ ते २६ आश्रम शाळा सुरू आहेत. यापैकी अनेक आश्रमशाळा कागदोपत्रीच असून बोगस विद्यार्थी हजेरी पटावर दाखवून कोट्यवधी रुपयांचे अनुदान संस्थाचालक लाटत आहे. असाच गैरप्रकार कोरपना तालुक्यातील स्व.चमनसेठ प्राथमिक आश्रमशाळा कोडशी (खु.) येथे समोर आला आहे. यासंदर्भात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.
कोडशी ( खु.) येथे स्व.चमनसेठ प्राथमिक आश्रमशाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग भरतात. हजेरी पटावर ७० निवासी विद्यार्थी दर्शविण्यात आले आहे. मात्र आश्रमशाळेत केवळ ७ विद्यार्थी उपस्थित राहतात. शाळेत कुठल्याही सोयी सुविधा नसून विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दजार्चे जेवण दिले जात आहे. याठिकाणी उपस्थित असलेल्या सातही विद्यार्थ्यांचे जीवन असुरक्षित आहे. वसतिगृह अधीक्षक संस्थाचालकाचा नातेवाईक असल्याने घरी बसूनच पगार लाटत असल्याची माहितीही समोर आली आहे. समाजकल्याण विभागाद्वारे प्रत्येक महिन्याला आश्रमशाळेला भेट देवून तपासणी केली पाहिजे, असा नियम आहे. मात्र अधिकारी कार्यालयात बसूनच तपासणी करीत असल्याने समाजकल्याण विभागाच्या आशीवादार्नेच जिल्ह्यात अशा अनेक बोगस आश्रमशाळांचा सुळसुळाट वाढला आहे.
शाळेला भेट दिली असता शाळेत ७ विद्यार्थी अंत्यत निकृष्ट दजार्चे जेवण करीत होते. अधीकक्ष, मुख्याध्यापक गैरहजर होते. ए.आर.शेख व व्ही.बी. गायकवाड असे दोन कर्मचारी शाळेत हजर होते. त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. प्रत्यक्षात पाहणी केली असता शाळेत कुठल्याही सोयी सुविधा नाही. अशा बोगस आश्रमशाळा चालविणाºया संस्थाचालकांसह मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक व समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
- अभय मुनोत
ग्रामपंचायत सदस्य, नांदा
यासंदर्भात मला पुरेशी माहिती नसून मुख्याध्यापक तथा शिक्षक शाळेचे व्यवस्थापन बघत आहे. यासंदर्भात दोषी आढळल्यास आम्ही कारवाही करू.
- शेख अख्तर शेख चमन
संस्थापक
सदर शाळेत पटावरील विद्यार्थी संख्येपेक्षा प्रत्यक्षात असलेली विद्यार्थी संख्या कमी आहे. समाजकल्याण विभागाच्या वतीने दोन महिन्यांपूर्वीच शाळेच्या कारवाईसंदर्भात पाऊल उचलले आहे.
- पी.जी. कुलकर्णी
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर