पंचप्राण उडाले...!

By Admin | Updated: December 13, 2015 00:46 IST2015-12-13T00:46:43+5:302015-12-13T00:46:43+5:30

‘शेतीमालाला रास्त भाव’ हा एकसुत्री कार्यक्रम तमाम शेतकऱ्यांचे पंचप्राण असलेले शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार शरद जोशी यांनी राबविला.

Panchaprana flies ...! | पंचप्राण उडाले...!

पंचप्राण उडाले...!

रत्नाकर चटप नांदाफाटा
‘शेतीमालाला रास्त भाव’ हा एकसुत्री कार्यक्रम तमाम शेतकऱ्यांचे पंचप्राण असलेले शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार शरद जोशी यांनी राबविला. ‘भिक नको हवे घामाचे दाम’ असा नारा देत १९७९ रोजी शेतकरी संघटनेची स्थापना करण्यात आली. ९ आॅगस्ट १९७९ रोजी चाकण येथे कांदा, उस, तंबाखू, दुध, भात, कापूस इत्यादी पिकांच्या रास्त भावासाठी आंदोलन उभे राहिले. या आंदोलनाचे लोण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले. शरद जोशींच्या विचारांचे वादळ सगळीकडे घोंगावत असताना चंद्रपूर जिल्ह्यातही १९८० मध्ये शेतकरी संघटना जोर धरू लागली. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, स्व.देवराव पा. मुसळे, राघवेंद्र देशकर, शरद कारेकर, प्रभाकर दिवे, डॉ.निळकंठ मोहितकर आदी शेतकरी नेते शरद जोशींच्या खांद्याला खांदा लावून जिल्ह्यात शेतकरी संघटनेची मोठी ताकद उभी केली. त्यानंतर शरद जोशी अनेकदा जिल्ह्यात आले. त्यांच्या आठवणी व त्यांचे व्यक्तिमत्व आजही येथील शेतकरी विसरू शकले नाहीत.

शेतकरी संघटनेची ताकद वाढू लागल्यानंतर जिल्ह्यात १९९१ मध्ये अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे हे भद्रावती विधानसभा तर अ‍ॅड. वामनराव चटप राजुरा विधानसभा क्षेत्रातून निवडून आले. यातील अ‍ॅड. चटपांना तब्बल १५ वर्ष विधानसभेत नेतृत्व करण्याची संधी शेतकरी संघटनेने दिली आणि शरद जोशींचा शेतमालाला रास्त भावाचा लढा अविरत सुरू ठेवला. विदर्भात कापसाचे व धानाचे पिक प्रमुख पिक आहे आणि या पिकाला भाव मिळावा, यासाठी विदर्भात शेतकरी संघटनेने ६ डिसेंबर १९८६ ते १२ डिसेंबर १९८६ यादरम्यान कापूस आंदोलन उभे केले. जिल्ह्यातील अनेक शेतकरी नेत्यांना नागपूर येथील कारागृहात डांबण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. त्याआधी शेतकरी संघटनेच्या चाकण येथील अधिवेशनानंतर १० नोव्हेंबर १९८१ रोजी शेतकरी संघटना आणि विदर्भाचा कापूस उत्पादक संघ मिळून गडचांदूर ते राजुरा रॅलीचे आयोजन करण्यात आले. दोन हायवे क्रॉस करणाऱ्या राजुरा चौकात ठाण मांडून १२ तास रास्ता रोको करण्यात आला. यात ८५ बैलगाड्या आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. अ‍ॅड. वामनराव चटपांसोबत अ‍ॅड. मुर्लीधर देवाळकर, पुरुषोत्तम येरगुडे, देवराव मुसळे, दादा लांडे, गणपत जिवतोडे, विजय बावणे, देवराव पानघाटे सहभागी होते. शरद जोशी नावाचे लोण चंद्रपूर जिल्ह्यात खेडोपाडी पोहचत असताना आंदोलनाची तिव्रताही तेवढ्याच वेगाने वाढत होती. रास्ता रोको, जेल भरो, विज टंचाई, रास्त भाव, कर्जमुक्ती आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटना आक्रमक होती. शेतकऱ्यांसोबत काम करणाऱ्या शेतमजुरांना न्याय मिळावा, यासाठीही आंदोलने उभी राहिली.
सन १९९० मध्ये राजुरा विधानसभा क्षेत्रात चटपांचा विजय झाल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचे लोण पसरले. शरद जोशी यांनी १९९० मध्ये महाराष्ट्रात जनजागृती रॅली काढली. यावेळी मूल येथे झालेल्या सभेत शरद जोशी यांनी कापसाबरोबरच धानालाही रास्त भाव मिळाला पाहिजे. उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला, तरच शेतकरी जिवंत राहील. अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही, ही भविष्यवाणी शरद जोशी यांनी या सभेत बोलताना केली होती. जिल्ह्यात औद्योगिकरणाचे जाळे घट्ट होत असताना दारूचाही महापूर वाहू लागला. तेव्हा शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीने दारूबंदीसाठी चळवळ उभी केली होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी बालकल्याण सभाती रत्नाताई आस्वले, माजी जि.प. सदस्या कमल वडस्कर, वंदना चटप, पोर्णिमा निरंजने, सिंधू बारसिंगे, इंदूमती काकडे आदींनी या आंदोलनात हिरहिरीने सहभाग घेतला. त्याचबरोबर भूमीधारकांना मालकी हक्क मिळावा यासाठीही जिल्ह्यात शेतकरी संघटनेने १९९० नंतर मोठी आंदोलने उभी केली. महाराष्ट्रात येण्यापूर्वी विदर्भ पूर्वीच्या मध्य भारतात होता. या मध्य भारतातील प्रथेप्रमाणे विदर्भातील सुमारे १२७ गावात जमीन कसवटीबाबत भूमिधारी पद्धत अस्तित्वात होती. यामुळे भूमीधारकांना मालकी हक्क मात्र मिळत नव्हता. काही कामासाठी शासनाने जमीन संपादन केल्यानंतरही भूमी मालकाला त्याचा मोबदला मिळत नव्हता. विदर्भातील ही १२७ गावे महाराष्ट्रात सामील झाली, मात्र भूमीधारी पद्धत १९६० नंतरही कायम राहिली. त्यानंतर शेतकरी संघटनेने यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात आंदोलन उभे केले. अ‍ॅड. वामनरावांनी हा प्रश्न लावून धरला. भूमीधारक भूमीस्वामी बनले. याचबरोबर वामनरावांचा मतदार संघ राजुरा हा पूर्वी नांदेड जिल्ह्यात होता. पुढे पुर्नरचनेमध्ये तो चंद्रपूर जिल्ह्याला जोडला. यावेळी तुकडेबंदी कायद्याखाली तुकडा याची व्याख्या करताना मराठवाडा विभागासाठी ओलिताखालील जमिनीबाबत एक एकर आणि कोरडवाहू जमिनीबाबत तीन एकर असा उल्लेख होता. विदर्भासाठी हेच प्रमाण ओलितासाठी एक एकर तर कोरडवाहूसाठी दोन एकर असे होते. ओलिताखालील जमीनधारकांना चंद्रपूरमध्ये गेल्यामुळे काही फरक पडणार नव्हता, पण कोरडवाहूमध्ये एक एकरचा फरक पडणार होता. जमीन तीच पण जिल्हा बदलीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे दिसून येत होते. यासाठी शरद जोशींनी वामनरावांना हा मुद्दा विधानसभेत लावून धरण्यास सांगितले आणि तुकडेबंदीच्या कायद्यात बदल करून शेतकऱ्यांना न्याय मिळाला.
शरद जोशी यांचा शब्द म्हणजे शेतकऱ्यांसाठी आदेश असायचा. त्यांच्या आदेशाबरहूकूम राज्यात पेटलेली आंदोलने सरकारने पाहिली आहेत. कापूस, धान, कांदा, ऊस आंदोलनांचा धसका घेतलेल्या सरकारला शेतकऱ्यांची दखल घ्यावीच लागली. ही ताकद निर्माण करणारे नेते शरद जोशी होते.

चंद्रपुरातील शेतकरी संघटनेचे प्रेरणादायी दोन अधिवेशने
सन २००० नंतर शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची धार बोथट होऊ लागली. वामनरावांच्या १९९९ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे कार्यकर्तेही खचले. मात्र शेतकरी संघटनेचा हा बालेकिल्ला कायम ठेवण्यासाठी शरद जोशींनी वारंवार जिल्ह्यात बैठका आयोजित करुन स्वत: उपस्थिती दर्शवली. राज्याच्या कार्यकारणीची बैठक, २००३ मधील शेतकरी संघटनेचे अधिवेशन चंद्रपुरात घ्यायचे खुद्द शरद जोशी यांनी सुचविले आणि शिलेदार असलेल्या वामनरावांना स्वागताध्यक्षाची जबाबदारी दिली. ९ ते ११ नोव्हेंबर २००३ ला शेतकरी संघटनेच्या नववे अधिवेशन चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राऊंडवर पार पडले.
यात लाखो शेतकऱ्यांनी विविध राज्यातून येऊन सहभाग घेतला. २५ डिसेंबर २००३ रोजी स्वतंत्र विदर्भासाठी राजुरा सास्ती येथे ‘कोयला रोको’ आंदोलनाची घोषणा करण्यात आली. यावेळी शरद जोशी यांच्यासोबत विदर्भवीर जांबुवंतराव धोटे, माजी खासदार पुरोहित, दत्ता मेघे, राम नेवले, रणजित देशमुख आदी उपस्थित होते. त्यानंतर ८ ते १० नोव्हेंबर २०१३ रोजी शेतकरी संघटनेचे १२ वे संमेलन चंद्रपुरात घेण्यात आले. यावेळी शेतीचे अर्थशास्त्र शरद जोशींनी प्रखरतेने मांडले आणि आर्थिक स्वातंत्र्याचा मंत्र शेतकऱ्यांना दिला.

बाटली फोडो आंदोलन
शेतमालाला रास्त भाव या मागणीसह शेतकरी संघटनेने शरद जोशींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात ८ मार्च १९८३ मध्ये दारूबंदी आंदोलन सुरू केले. यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत शेतकरी संघटनेची ताकद मोठी होती. संघटनेचे आमदार कमी असले तरी शरद जोशींच्या मार्गदर्शनात तयार झालेले शिलेदार कर्तृत्व गाजवत होते. राज्यात दारूबंदी आंदोलनात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर जवळपास एक हजार १११ फौजदारी खटले भरण्यात आले. असे खटले परत घेण्यास शेतकरी संघटनेच्या आमदारांनी भाग पाडले. दारूबंदी आंदोलनामुळे शासनाला दारुबंदीचे निर्णय या काळात घ्यावे लागले आणि त्यामुळे राज्यातील ४१ दुकाने बंद करण्यात आली. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील २८ दुकानांचा समावेश होता. या आंदोलनात त्यावेळी जिल्ह्यात माजी आमदार पाशा पटेल, सदाभाऊ खोत, वडले पाटील यांनी चटपांसोबत नेतृत्वाची धुरा सांभाळली. चंद्रपूरसह गोंडपिपरी, विरूर, नांदाफाटा आदी ठिकाणी बाटली फोडो आंदोलनात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Panchaprana flies ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.