खरीपासाठी एक लाख १२ हजार मेट्रिक टन खत
By Admin | Updated: June 17, 2017 00:31 IST2017-06-17T00:31:06+5:302017-06-17T00:31:06+5:30
सध्या खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त असून कृषी विभागानेही खरीप हंगामाची जय्यत तयारी केली आहे.

खरीपासाठी एक लाख १२ हजार मेट्रिक टन खत
युरिया व डीएपी खताची सर्वाधिक मागणी : यावर्षी खताची टंचाई भासणार नसल्याचा कृषी विभागाचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त असून कृषी विभागानेही खरीप हंगामाची जय्यत तयारी केली आहे. यावर्षी खरीप हंगामात खताची टंचाई भासू नये यासाठी शासनाकडे १ लाख ३४ हजार ८७३ मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली होती. यापैकी १ लाख २२ हजार ६०० मेट्रिक टन खताचे आवंटन शासनाने मंजूर केले आहे. त्यामुळे यावर्षी कुठेही खताची टंचाई निर्माण होणार नाही, असे कृषी विभागाने म्हटले आहे.
दरवर्षी खरीप हंगामात खत टंचाई निर्माण होत असते. अनेक विक्रेते खताचा साठा करून ठेवत कृत्रिम टंचाई निर्माण करतात. त्यानंतर जादा दराने खताची विक्री करीत असतात. यातून शेतकऱ्यांची मोठी फसगत होत असते. हा प्रकार दरवर्षीच घडत होता. त्यामुळे राज्य शासनाने यावर्षी खतविक्रीचे नवीन निकष तयार केले आहे. या निकषाच्या आधारे यावर्षी खत विक्री होणार असून यात दोषी आढळणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
जिल्हा प्रशासनाने तालुकानिहाय खताची मागणी लक्षात घेवून राज्य शासनाकडे खताची मागणी केली होती. मात्र मागणी केलेल्या खतापैकी १ लाख २२ हजार ६०० मेट्रीक टन खत जिल्ह्यासाठी मंजूर केले आहे. या खताचे तालुकानिहाय आवंटन जिल्हा प्रशासनाने मंजूर केले असून सर्वाधिक खत राजुरा, कोरपना, चिमूर, वरोरा व ब्रह्मपुरी तालुक्यांना वाटप केले जाणार आहे. या खतामध्ये युरिया व डीएपी खताची सर्वाधिक मागणी आहे.
शासनाने या खताची किंमत ठरवून दिली असून जादा दर आकारल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार करावी, त्या विक्रेत्यावर कारवाई केली जाईल, असे कृषी विभागाने म्हटले आहे.
पाच तालुक्यांना सर्वाधिक खतांची गरज
चंद्रपूर जिल्ह्यात धान, कापूस, तूर या सोबत सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सिंदेवाही, ब्रह्मपुरी परिसरात धान तर चिमूर, राजुरा, वरोरा, कोरपना तालुक्यात कापसाचे उत्पादन होते. या पाचही तालुक्यांसाठी सर्वाधिक खताची मागणी आहे. जिल्हा प्रशासनाने ब्रह्मपुरी तालुक्याला १० हजार २० मेट्रीक टन, चिमूर तालुक्याला १४ हजार २१५ मेट्रीक टन, कोरपना तालुक्याला १४ हजार ४७६ मेट्रीक टन, राजुरा तालुक्याला १० हजार ६४१ मेट्रीक टन तर वरोरा तालुक्याला १४ हजार १३७ मेट्रीक टन खताचे आवंटन मंजूर केले आहे.
५ हजार १२६ क्विंटल बियाणांची विक्री
खरिपासाठी यावर्षी भात, ज्वारी, तूर, सोयाबीन, कापूस आदी बियाणांची ७५ हजार ९९९ क्विंटल बियाणांची मागणी होती. शासनाकडून ३१ हजार ५५९ क्विंटल बियाणे प्रशासनाकडे उपलब्ध झाली आहेत. यापैकी ५ हजार १२६ क्विंटल बियाणांची आतापर्यंत विक्री झाली आहे. यात १ हजार २७३ सार्वजनिक तर ३ हजार ८५३ खाजगी स्वरूपात बियाणे विक्री झाले आहे.
युरिया व डीएपी खताची
सर्वाधिक मागणी
कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांकडून दरवर्षी युरिया व डीएपी खताची सर्वाधिक मागणी असते. त्यानुसार प्रशासनाने शासनाकडे दोन्ही खताची मागणी केली होती. शासनाने युरिया खताचे ५३ हजार ३०० मेट्रिक टन तर डीएपी १३ हजार मेट्रिक खताचे वाटप मंजूर केले आहे.