आता स्मशानभूमीतही जागा मिळेना; अंत्यविधीसाठी प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 05:00 IST2021-04-26T05:00:00+5:302021-04-26T05:00:40+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात दररोज १५००पेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना रुग्णासह मृतकांच्या आकडेवारीतही वाढ होत आहे. चंद्रपूर शहरात कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर पठाणपुरा गेटबाहेर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. येथे एकाचवेळी सात ते आठ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था आहे.

आता स्मशानभूमीतही जागा मिळेना; अंत्यविधीसाठी प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना महामारीचे संकट गहिरे होत आहे. शहरात दररोज कोरोनाने २० ते २५ जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे चंद्रपुरातील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी प्रशासनावर ताण येत आहे. कधीकधी ओटे उपलब्ध नसल्यास खालीसुद्धा अंत्यसंस्कार उरकण्यात येत असल्याचे विदारक वास्तव आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात दररोज १५००पेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना रुग्णासह मृतकांच्या आकडेवारीतही वाढ होत आहे. चंद्रपूर शहरात कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर पठाणपुरा गेटबाहेर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. येथे एकाचवेळी सात ते आठ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था आहे. मात्र, आता कोरोनाने दररोज मृत्यू होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अंत्यसंस्काराठी प्रतीक्षा करावी लागत आहे. मनपा महापौर राखी कंचर्लावार यांनी नुकतीच स्मशानभूमीची पाहणी करुन ५० ते ६० मृतदेह ठेवता येतील, इतक्या क्षमतेने सिमेंट क्राकीट प्लॅटफॉर्म बांधण्याचे निर्देश दिले.
२२ जिगरबाज योध्यांकडून विधिवत अंत्यसंस्कार
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा अंतिमसंस्कार हा संवेदनांना गोठवून टाकणारा क्षण. निर्बंधामुळे नातलगसुध्दा मृतदेहाला खांदा देऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत परिवार, कुटूंब, धर्म, समाज बाजूला ठेवून चंद्रपूर महानगरपालिकेचे २२ जिगरबाज योद्धे मागील ९ महिन्यापासून न थकता अंतिम संस्कारासाठी जीवाची बाजी लावत आहेत.
चंद्रपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठाणपुरा गेटबाहेर इरई नदीच्या काठावर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत केले जाते.
या स्मशानभूमीत गेल्या वर्षभरात आतापर्यंत सातशेहून अधिक कोरोनाबाधीतांच्या मृतदेहावर त्यांच्या धर्मातील प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येत आहे.
अत्यविधीस उशीर झाल्याने मारहाण
२३ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास डिझेल वेळेत न पोहचल्याने अंत्यविधीला उशीर झाला. यावेळी मृताच्या नातलगांनी मजूर कर्मचारी मिलिंद शंकरराव पुट्टेवार (२६) याला शिवीगाळ करुन हाताबुक्यांनी मारहाण केली व पळुन गेले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरुन कलम ३२३, ५०४, ५०६ भादंविप्रमाणे एनसी नोंद करण्यात आली आहे.