Now the eyes of farmers on 'Pushya' nakshatra | आता ‘पुष्य’ नक्षत्राकडे शेतकऱ्यांच्या नजरा
आता ‘पुष्य’ नक्षत्राकडे शेतकऱ्यांच्या नजरा

ठळक मुद्देचार नक्षत्रे गेली कोरडी : दुबार पेरणीचे जिल्ह्यावर संकट

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रोहिणी, मृग पाठोपाठ आद्रादेखील कोरडे गेल्याने शेतकऱ्यांची आशा ६ जुलैपासून सुरू झालेल्या पुनर्वसू नक्षत्रावर होती. या नक्षत्रकाळात जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता वर्तविली गेली. प्रत्यक्षात या नक्षत्रातही पावसाचा खंड पडला. त्यामुळे दुबार पेरणीचे सावट आहे. आता शनिवार २० जुलैपासून सुरू होणाऱ्या पुष्य नक्षत्राकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, गुरुवारी जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली, मात्र हुलकावणीच दिली.
आर्द्रा नक्षत्र काळात जोरदार पाऊस होणार असल्याचे भाकित हवामान विभागाने व्यक्त केले होते. ्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस तसेच सोयाबिनची पेरणी केली. प्रत्यक्षात १५ दिवसांपासून पावसाचा खंड पडला. आता कोवळी पिके माना टाकत आहेत. बिजांकूर करपले आहेत, तर पेरणी झालेले बियाणे जमिनीत आद्रतेअभावी कुजायला लागले आहे. पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या पिकांची पावसाअभावी वाढ खुंटली आहे. त्यातच वन्यप्राणीही या पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्णत: खचला आहे. आता शनिवारपासून सुरू होणाऱ्या पुष्य नक्षत्राकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. या नक्षत्राचे वाहन गाढव असल्याने अनियमित स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

पावसाच्या दडीने शेतकरी हैराण
कापूस, सोयाबीन, तूर या पिकांची पेरणी झाली आहे. यापैकी काही शेतातील पिके आता कोमजली आहेत. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. पावसाने आणखी काही दिवस हुलकावणी दिल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. गुरुवारी जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. मात्र या पावसामुळे फार काही परिणाम पडणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.दरम्यान, धान उत्पादक शेतकरी अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.


Web Title: Now the eyes of farmers on 'Pushya' nakshatra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.